चंद्रपूर: नीट (NEET) परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या अनुराग अनिल बोरकर (२०) या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे घडली आहे. हुशार विद्यार्थ्याच्या आत्महत्येने नवरगाव गावावर शोककळा पसरली आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा अनुराग हा मुलगा होता. त्याने नीट यूजी-२०२५ परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून १४७५ वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. त्याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला होता आणि याच प्रवेशासाठी त्याला आज मंगळवार २३ सप्टेंबर रोजी पहाटे गोरखपूरला जायचे होते.

मात्र, त्याआधीच त्याने आपले जीवन संपवले. मंगळवारी (दि. २३) पहाटे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश करण्यासाठी जायचे असल्याने सोमवारी (दि. २२) रात्री जेवण झाल्यानंतर बोरकर कुटुंब अंदाजे १०.३० च्या सुमारास झोपले. मंगळवारी पहाटे २.३० वाजता अनुरागच्या आई बाथरूमकरिता उठली असता आईला त्याच्या खोलीतील लाईट सुरू असल्याचे दिसले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, अनुराग पंख्याला पांढऱ्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. त्यांनी तातडीने पती अनिल बोरकर यांना याची माहिती दिली. दोघांनी मिळून गळ्यातील दोर कापून त्याला खाली उतरवले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या अनुरागचे दहावीपर्यंतचे शिक्षण सिंदेवाही येथील देवयानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले होते आणि बारावीचे शिक्षण त्याने नागपूरच्या सेंट पॉल ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण केले होते. तो एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याने आपल्या कठोर परिश्रमातून नीट परीक्षेत यश मिळवले होते, त्यामुळे त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते.

अनुरागच्या या यशामुळे त्याचे शिक्षक, मित्र आणि नातेवाईक यांनी त्याचे अभिनंदन केले होते. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एवढे मोठे यश मिळवूनही अनुरागने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. सिंदेवाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका यशस्वी विद्यार्थ्याने असे पाऊल उचलल्याने शैक्षणिक आणि करिअरच्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनुरागच्या मागे त्याचे आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. मंगळवारी (दि. २३) दुपारी नवरगाव येथील मोक्षधाम परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.