लोकसत्ता टीम

अकोला : एक नवा धुमकेतू ‘त्सूचिन्शान एटलास’ पृथ्वीच्या जवळ येणार आहे. लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या या नव्या पाहुण्याच्या दर्शनाचा दुर्लभ योग हजारो वर्षांनंतर जुळून येत आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. परतीच्या पावसाला निरोप आणि येणाऱ्या धुमकेतूच्या स्वागताला अवकाश प्रेमींनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अवकाश प्रेमींना धुमकेतूची प्रतीक्षा

बालपणापासून मानवी जीवाला वेड लावणारे आकाश ग्रह-ताऱ्यांच्यासोबत क्वचित प्रसंगी एखादा चिरस्मरणीय प्रसंग अनोखा आनंद देऊन जातो. सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू अती लंब वर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात, तेव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडत असते.

आणखी वाचा-राज्यावर कर्मचारी संपामुळे वीज संकट… महावितरणकडून आलेले चर्चेचे निमंत्रण…

आकाशातील एक अप्रतिम नजारा म्हणून अवकाश प्रेमींना धुमकेतूची प्रतीक्षा लागली राहते. सन १९८६ मध्ये हॅलेचा धुमकेतू अनेकांच्या स्मरणात कायम आहे. हाच धुमकेतू सन १९१० साली आला होता, त्यावेळी दिवसा सुद्धा दिसत होतो, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. सूर्यमालेच्या बाहेर ‘ऊर्ट क्लाऊड’च्या पट्ट्यातून सूर्याभोवती फिरणारे धुमकेतू पृथ्वी आणि सूर्याजवळ येतात, तेव्हा त्यांच्यात असलेल्या खडक, धूळ, बर्फ व वायूंच्या मिश्रणाच्या अनियमित गोळ्यातील घटकांचे रुपांतर सूर्यप्रकाश व उष्णतेने लांब-लचक शेपटीत होते. यालाच काही लोक शेंडे नक्षत्र म्हणून ओळखतात, अशी माहिती त्यांनी दिली.

‘पर्पल माउंटन’ वेधशाळेने लावला शोध

आकाशात आता दिसणारा धुमकेतू ‘त्सूचिन्शान एटलास’ किंवा ‘सी २०२३ ए ३’ या नावांनी ओळखला जातो. या धुमकेतूचा शोध ९ जानेवारी २०२३ रोजी ‘पर्पल माउंटन’ वेधशाळेने लावला आहे. आगामी २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा आकाश पाहुणा सूर्य आणि पृथ्वी जवळ येणार आहे. त्याचे तेज वाढणार असल्याने धुमकेतूचा हा अनोखा नजारा सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर सिंह राशी जवळ पाहता येणार आहे.

आणखी वाचा- पंचनामे न करताच शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र, महसूल मंत्री म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्टोबरच्या मध्यात सुद्धा त्याचा आनंद घेता येईल. सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शूक्र ग्रहाजवळ धुमकेतू ‘त्सूचिन्शान एटलास’ बघता येईल, असे प्रभाकर दोड म्हणाले. आकाशातील अपूर्व नजारा आणि अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अवकाश प्रेमी, शालेय विद्यार्थ्यांसह प्रत्येकाने घ्यायला हवा. अशी संधी पुन्हा येत नाही, असे देखील त्यांनी सांगितले.