लोकसत्ता टीम

अकोला: आकाशात नव्यानेच शोध लागलेल्या धुमकेतूचे दर्शन होणार आहे. ११ सप्टेंबरला पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समूहात युती होत आहे. त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू पूर्व क्षितिजावर पाहता येईल. याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

सूर्यमालेत ग्रह, लघुग्रह, उपग्रह या सारखेच धूमकेतू सुद्धा सूर्यकुलाचेच घटक आहेत. वेगवेगळ्या कालावधीत ते सूर्याला प्रदक्षिणा करीत असतात. त्यात काही नियमित तर काही अनियमित स्वरूपाचे असतात. एक असाच अनियमित स्वरूपाचा धूमकेतू गेल्या महिन्यातच नव्याने शोधला आहे. लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र म्हणून अशीही त्याची ओळख आहे. १२ ऑगस्टला जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमूरा यांनी याचा शोध लावला. त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते.

आणखी वाचा-वर्धा: माहेरी गेलेल्या पत्नीस आणायला गेला अन् गाडीसह पुरात वाहून गेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या धूमकेतूचे सूर्यापासूनचे अंतर ०-८४ खगोलीय एकक एवढे आहे. ११ सप्टेंबर रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समूहात युती होत आहे. त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू पूर्व क्षितिजावर पाहता येईल. अंधाऱ्या व निरभ्र आकाश असतांना द्विनेत्रीमधून अधिक चांगला दिसेल. या धूमकेतूचे सूर्यापासून सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या ५७ पट एवढे असते. ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान या नव्या धूमकेतूचे पहाटे साधारण ५.१५ ते ५.३० च्या आसपास पूर्व क्षितिजावर दर्शन होईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.