Nagpur Farmers Protest : प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवार सायंकाळपासून वर्धा महार्गावरील पासोडी येथे सुरू केलेल्या महाएल्गार आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग ४४ वरची वाहतूक गेल्या १० तासांहून अधिक कालावधीपासून ठप्प झाली आहे. हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. या कोंडीमुळे समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनाही आरंभ बिंदूपर्यंत पोचणे कठीण होऊन बसले आहे.
रात्रभर रस्त्यावरच मुक्काम ठोकलेल्या आंदोलकांपैकी काही जणांनी ट्रकचालकांना दमदाटी केली. मात्र पोलीसच बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिला आणि मुलांची कुचंबना होत आहे.
वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद आणि सोलापूरकडे जाणारी वाहतूक गेल्या १० तासांपासून ठप्प पडली आहे. रात्री पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसची अमरावती मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
मिहानच्या खापरी उड्डाणपूलापासून जामठा मैदानाकडे आणि जामठावरून बुटीबोरीपर्यंत दोनही दिशेने अडकून पडलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कोंडीत फसलेली खासगी वाहने, प्रवासी वाहने आणि ट्रकमधील चालकांची अक्षरशः कुचंबना होत आहे. दूरदूरपर्यंत हॉटेल देखील नसल्याने तहान भुकेने महिला- मुलांची होरपळ सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातील चार महामार्ग आंदोलक शेतकऱ्यांनी अक्षरशः अडवून धरले आहेत. वर्धा- चंद्रपूर सोबतच यवतमाळ, हैदराबाद, अमरावती आणि जबलपूरकडे जाणाऱ्या सर् मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहने कोंडीत अडकल्याचा सर्वाधिक फटका दुसऱ्या दिवशीही या मार्गावरी रुग्णालयांना बसत आहे.
आंदोनस्थळी प्रचंड पोलीस फौजफाटा
सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारी लोहमार्ग वाहतूकही बंद करू, असा इशारा प्रहार संघटनेने दिल्याने धास्तावलेल्या गृहमंत्रालयाने संपूर्ण पोलीस फौजफाटा वर्धा मार्गावर उतरवला आहे. स्वतः पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन उटनकर सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले.
वाहतूक पर्यायी मार्गावर वळती
वर्धा मार्गावरील आंदोलनामुळे हैदराबाद, चंद्रपूर, हिंगणघाट कडून येणारी वाहने गिरड – उमरेड मार्गे नागपूरात प्रवेश करत आहेत. तर काही वाहने बोर, हिंगणा मार्गेही येत आहेत.बाह्यवळण रस्त्यावरून नागपूरच्या दिशने येणारी वाहतूक बंद असल्याने काही वाहनचालक रामटेक बाह्यवळण रस्ता धरून हुडकेश्वर, घोगली अथवा दिघोरीकडून नागुपुरात येत आहेत. नागपूर उमरेड महामार्गावरील ५ ते ६ पेट्रोल पंप सध्या कोरडे पडले आहेत. या पंपावर पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे अनेक वाहन चालकांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
रुग्णवाहिकांची चाकेही थांबली
वर्धा मार्गावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नॅशनल कँन्सर इन्स्टिट्यूट, केअर, विवेकानंद मिशन सारकी महत्वाची रुग्णालये आहेत. एमसीआय रुग्णालयात शेजारील मध्यप्रदेशातून येणरे रुग्ण रामटेकमार्गे बाह्यवळण रस्त्यावरून येतात. मात्र वर्धा मार्गावरील यारुग्णालयांकडे जाणारे सर्व मार्ग बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. विनवण्या करूनही आंदोलक रुग्ण वाहिकांनाही रस्ता मोकळा करून द्यायला तयार नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागत आहे.
रेलरोकोच्या घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणले
आंदोलकांनी आऊटर रिंग रोडकडे जाणाऱ्या मार्गांवरदेखील आडवी वाहने लावली आहेत. त्यामुळे समृद्धीला जाण्यातदेखील अनेक अडचणी येत आहेत. आंदोलनस्थळी आता रेल्वे रोकोच्या घोषणांनी मंडप दणाणून जात आहे. आंदोलकांकडून रात्री अनेक ट्रकचालकांना धमकी देण्याचे प्रकार घडले. जाममध्ये फसलेल्या प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत असून तहानभुकेने बेहाल मुले आणि महिलांची कुचंबणा होत आहे.
