वर्धा : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ता असलेले नीतेश कराळे उर्फ कराळे मास्तर म्हणून व्यक्तिमत्व चांगलेच लोकप्रिय आहे. वऱ्हाडी बोलीत ते बोलतात, तेव्हा श्रोते हसू हसू थकतात. या शैलीमुळेच त्यांना निवडणुकीवेळी भाषण देण्यासाठी चांगलीच मागणी असते. अशी लोकप्रियता एकीकडे असतांनाच त्यांच्या टिकाकार लोकांची पण संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवर उमटणाऱ्या प्रतिक्रियेतून दिसते.
पक्षाचा प्रवक्ता पण त्यालाच नेत्यास भेटू दिल्या जात नसेल तर चर्चा होणारच. टिकाकार मंडळींनी हीच संधी साधली. नाशिकच्या मेळाव्यात कराळे मास्तरला हॉटेलातून हाकलून देण्यात आले. शरद पवार यांना भेटू दिले नाही, असे दृष्य सोशल मीडियावार दिसू लागले आणि ते चांगलेच व्हायरल पण होवू लागले.
नेमके काय, यावर बोलतांना कराळे मास्तर म्हणतात की मी लोकप्रिय आहेच. माझ्याविषयी काही घडामोड घडली की ती लगेच उमटते. कारण मग त्या व्हिडीओला अफाट व्हिवूज मिळतात. मला त्याची नाराजी नाही. त्यांचे माझ्यावर प्रेम, असे मी समजतो. नाशिक येथील पक्षाच्या अधिवेशनात मी गेलो होतो. त्यावेळी मी समोरच्या रांगेत बसलो होतो. कार्यकर्त्यांनी मला बोलू देण्याची मागणी केल्यावर शरद पवार यांनी मला बोलतो कां म्हणून विचारले. मी घाई पाहून दहा मिनिटात भाषण आटोपले. त्यास प्रतिसाद पण मिळाल्याचे सगळ्यांनी बघितले असेल.
हॉटेलात अडविले हा प्रकार, अशी विचारणा केल्यावर कराळे म्हणतात की ही आदल्या दिवशीची बाब आहे. पवार साहेब ठरलेल्या हॉटेलऐवजी दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबले होते. मी पोलिसांना विचारले. मग साहेबांचे पीए रानडे यांना फोन लावला. त्यांनी आठव्या मजल्यावर येण्यास सांगितले. तसेच पक्षाचे दिंडोरी येथील खासदार भास्करराव भगरे यांच्याशी पण बोललो. ते पण म्हणाले येऊन जा. तिथल्या पोलिसवाल्यांनी मला नं ओळखल्याने त्यांनी मला फोनवर बोलू द्या, असे सुचविले. सोडा म्हटल्यावर सोडले. पण त्याचवेळी माझा एक सोबती यायचा असल्याने मी थांबलो. पण त्याचाच व्हिडिओ निघाला. मला अडविले, असा प्रचार झाला. पण अडवायचा विषयच नाही. माझा व्हिडिओ चालतो नं, म्हणून ही असा प्रसार. माझी भेट झाली.
कराळे मास्तर असा खुलासा करतात आणि म्हणतात की पवार मी कुठेही दिसलो की आवर्जून बोलतात. वेळ देतात. भारतात असा सहज भेट देणारा दुसरा नेताच नाही. मुंबईत सिल्व्हा ओक, पुण्यात मोदी बाग व बारामतीत गोविंद बाग असो, मला दोन मिनिटात त्यांची वेळ मिळाली आहे. मी सोडाच, सामान्य व्यक्तीस पण ते वाट बघत ठेवत नाही.