नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. नेत्यांकडून होणाऱ्या व्यक्तिगत टीका टिप्पणीची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागली आहे. ‘आरे’ला ‘कारे’ने उत्तर देऊन ‘हम किसीसे कम नही’ हे दर्शवण्याचा रोज प्रयत्न होत आहे. प्रचाराच्या या गढूळ वातावरणातही काही नेत्यांनी स्वत:ला वेगळे ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. त्यानिमित्ताने होणाऱ्या प्रचाराचा थर कमालीचा घसरला आहे. मुद्याऐवजी व्यक्तिगत टीका टिप्पणीला जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता ‘भटकती आत्मा’ अशी टीका केली. संजय राऊत यांनी गाडून टाकण्याची भाषा वापरली, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी तर चक्क शरद पवार गटाच्या दोन आमदारांना त्यांचे नाव घेऊन दम दिला. ठाकरे गटाच्या महिला नेत्याने तर कल्याण मतदारसंघात भाषण करताना मुख्यमंत्र्यांवर कठोर शब्दात व्यक्तिगत टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, स्टार प्रचारक नितीन गडकरी यांनी मात्र प्रचारात वेगळेपण जपले आहे.
हेही वाचा – नागपूर : रेल्वे तिकीट तपासणीस अल्फिया पठाण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये चमकली
हेही वाचा – रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका, तीन दिवसात २७ जणांना पकडले
नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. प्रचारादरम्यान गडकरी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांवर व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळली होती. नागपूरची निवडणूक आटोपल्यावर ते महाराष्ट्रात होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी गेले. तेथेही त्यांनी कटाक्षाने ही बाब पाळल्याचे दिसून येते. शुक्रवारी त्यांनी रावेर मतदारसंघातील विदर्भातील मलकापूरमध्ये सभा घेतली. तेथेही त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारण पॅटर्नचामुद्दा उपस्थित केला. जालना जिल्ह्यातील सिल्लोडमधील सभेत त्यांनी गाव, गरीब, शेतमजुरांच्या मुद्यावर भाषण केले. बीड लोकसभा मतदारसंघात माजलगावमधील सभेत त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाचा मुद्दा मांडला.