नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्रात दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फारसे यश मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांनी विविध योजना सुरू करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे सुरू केले आहे. यात ‘लाडकी बहिण योजना’ सर्वात प्रसिद्ध झाली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडल्या बहिण्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोफत योजनांच्या भरवश्यावर राजकारण करता येत नाही. ‘रेवडी संस्कृती’ देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी धोकादायक असल्याचे वक्तव्य असलेली चित्रफीत सर्वत्र फिरत आहे.

‘रेवडी संस्कृती’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी दोन वर्षांआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आप सरकारवर निशाणा साधत ‘रेवडी संस्कृती’ देशासाठी धोकादायक असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच त्याचे गंभीर आर्थिक परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्यानंतर देशाच्या राजकारणात रेवडी संस्कृती हा शब्दप्रयोग चर्चेत आहे. नागरिकांना मोफत सुविधा पुरवण्याविषयी समाजात दोन मते आहेत. एक मतप्रवाह अशाप्रकारे मोफत वस्तू दिल्याने सरकारवर आर्थिक ताण येतो आणि आर्थिक गणित बिघडते असे म्हणतो. तसेच त्याचा पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या कामांवर परिणाम होतो, असे म्हणतो. हाच धागा पकडून पंतप्रधान मोदींनी मोफत देण्याची सवय देशाला अडचणीत आणेल असे म्हणाले होते.

हेही वाचा…भूतबाधेच्या नावावर आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार; भोंदूबाबाला अखेर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरींची व्हायरल चित्रफित काय आहे?

सवलतींच्या योजनांमुळे १८ लाख कोटींच नुकसान आहे. त्यात मोफत वीज दिली तर हे क्षेत्र धोक्यात येईल. मिक्सर, ईडली पात्र अशा वस्तू सरकारने फुकट वाटल्याने राजकारण होत नाही. त्यासाठी आम्हाला रोजगार निर्माण करावे लागतील, गरीबांना घर बांधून द्यावे लागतील, स्वच्छ भारत बनवावे लागेत, नवीन उद्योग आणावे लागतील असेही गडकरी म्हणाले. अशा कायमस्वरूपी उपाय योजना आवश्यक आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी केवड ‘रेवडी’ वाटल्याने देशाचे आणि आर्थिक स्थितीचे नुकसान होईल. मोफत वस्तू मिळाली तर लोकांना त्याचे महत्त्व राहत नाही. जेथे आवश्यक आहे तेथे सवलती द्यायला हव्यात. मात्र, सध्या सुरू असलेले राजकारण मान्य नाही असेही गडकरी म्हणाले. लाडकी बहिण योजनेच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या या वक्तव्याची चित्रफित सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.