लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रस्ते बांधणीतील धडका सर्वश्रृत आहे. तसेच ते त्यांच्या बेधडक बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. शुक्रवारी त्यांनी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात देशातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना सल्ला दिला आहे. तो राजकीय नेत्यांना खरंच पचनी पडले काय, असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी यांनी या कार्यक्रमात नेत्यांना नेमका काय सल्ला दिला आहे जाणून घेऊ या. ते म्हणाले, “मी सगळ्या राजकीय नेत्यांना नेहमी सल्ला देत असतो. सगळ्यांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कारण, तीस- चाळीस वर्षे राजकीय नेत्याचे जीवन किती अनियमित आणि बेशिस्त असू शकते हे मी बघितले आहे. दुसरा सल्ला असा की, उपाशीपोटी तत्वज्ञान शिकवले जाऊ शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा आणि म्हणून जे कोणते तुमचे काम असेल ते प्रामाणिकपणे, व्यवस्थित करा, पैसा कमवा आणि मग राजकारण, समाजकारण करा. राजकारण हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण हे सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास तुम्हाला कोणी भ्रष्ट करू शकत नाही. स्वाभिमानाने काम करू शकता. या दोन गोष्टी दीर्घकालिन राजकारणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. माझ्या अनुभवातून हे अनेक कार्यकर्त्यांना देखील सांगत असतो.