वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणाऱ्या लोकांत सानथोर अशी सर्वांचीच गर्दी असल्याचे चित्र बघायला मिळते. त्याचे कारण काय, तर होणारी अपेक्षापूर्ती. गडकरी यांची भेट झाली आणि अडचण सांगितली की ती दूर होणारच, असा विश्वास स्वतः अनुभव आलेले सांगत असतात. त्यात आता एका मान्यवर व्यक्तीची भर पडली आहे. आणि असा मान्यवर जर पहिल्याच भेटीत प्रभावित होत असेल तर त्याची चर्चा पण सूरू होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे कश्याची विक्री व का वाढली याचा पण खुलासा या व्यक्तीने केला.
विविध कारणांनी चर्चेत राहणाऱ्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठास सहा महिन्यापूर्वी पूर्णवेळ कुलगुरू लाभला. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख प्रा. कुमुद शर्मा यांची राष्ट्रपतींनी यापदावर नियुक्ती केली. आणि विद्यापीठ प्रशासनाने निश्वास सोडला. त्या या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या. विख्यात साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष राहून चूकलेल्या श्रीमती शर्मा यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केले आहेत. कुलगुरू म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी सूरू केलेल्या भेटीत पहिली भेट नितीन गडकरी यांच्याशी झाली. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत विद्यापीठाच्या प्रगती व विकास कार्याबाबत चर्चा झाली.
विद्यापीठातर्फे हिंदी भाषेचा विश्व पातळीवर प्रचार करण्यासाठी चाललेले प्रयत्न, नवे अभ्यासक्रम, शैक्षणिक प्रगती याची माहिती कुलगुरू शर्मा यांनी दिली. त्यावर गडकरी म्हणाले की वर्धेच्या भूमिचे महात्मा गांधी, विनोबा भावे व हिंदी चळवळीशी घट्ट नाते आहे. विद्यापीठास अपेक्षित ते सहकार्य केल्या जाईल. विद्यापीठ व उद्योग विश्व यांच्यात समन्वय असावा. त्यामुळे युवा पिढी शिक्षण झाल्यावर आत्मनिर्भर होवू शकेल. ही शिष्टाचार भेट सकारात्मक व उत्साहवर्धक ठरेल, असा विश्वास विद्यापीठातर्फे व्यक्त करण्यात आला.
या भेटीने कुलगुरू कुमुद शर्मा उत्साहित झाल्याचे दिसून आले. त्या म्हणतात की नितीन गडकरी हे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरिचित आहे.मी त्यांच्या निवासस्थानी पोहचली, तेव्हा मोठी गर्दी दिसून आली. जिथे अपेक्षा असते तिथेच गर्दी होते. गडकरी हे सर्वांना मदत करतात, अशी त्यांची ख्याती. मला ते दिसून आले. त्यांनी देशभर राष्ट्रीयमहामार्गाचे जाळे विणले. त्यामुळे प्रवास सुखकर झाला, अशी भावना व्यक्त करीत कुलगुरू शर्मा म्हणाल्या की मी गंमतीत त्यांना म्हणाले की तुमच्यामुळे लोकांना चांगल्या गाड्या विकत घेण्याची प्रेरणा झाली. कारचे मार्केट वाढले, यावर त्यांनीही हसून प्रतिसाद दिला. विद्यापीठात भेट देण्याची विनंती केली. एका प्रसिद्ध साहित्यिकसोबत आलेला अनुभव. ते येणार अशी माहिती मिळताच सभागृह तुडुंब भरे. कारण ते निराश करणार नाही, अशी भावना. नितीन गडकरी यांच्याबाबत मला तेच दिसून आले, असे मनोगत कुलगुरू शर्मा यांनी व्यक्त केले.