नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे एक भन्नाट कल्पना राबवणारे, नवनवीन स्वप्नं बघणारे व्यक्तिमत्व. स्वप्न बघून ते पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याचे विविध प्रयोग नागपूरकर आणि देशवासीयांना माहिती आहे. . आता नागपुरातील धापेवाडा येथे तयार झालेली साडी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना घालण्याची विनंती केली आहे. त्याबाबत नागपुरात शनिवारी ॲग्रोव्हिजनतर्फे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महत्वाचे भाष्य केले.
नितीन गडकरी म्हणाले, नागपूरसह विदर्भ एकेकाळी हातमाग व पावरलुमच्या साड्यांसाठी प्रसिद्ध होते. ही ओळख पून्हा निर्माण करण्यासाठी धापेवाडा येथे धापेवाडा टेक्सटाईल नावाने पिवर सिल्कचा कारखान्यावर काम सुरू आहे. येथे प्राथमिक स्वरूपात तयार होणाऱ्या साड्यांवर झारखंड येथे प्रिंटचे काम केले गेले. त्यामुळे ही साडी इतकी सुंदर झाली की त्याला सर्वत्र मागणी वाढली आहे.
सध्या साड्यांसाठी सुमारे २०० जणांची प्रतिक्षा यादी आहे. दरम्यान धापेवाडातील टेक्सटाईल्सची वास्तू सुमारे सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. येते कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान हेमा मालिनी यांना मी येथे धापेवाडाला तयार होणाऱ्या साडीतच येण्याची विनंती करणार असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले. हेमा मालिनी येथील साडीवर आल्यास आपोवार या साडीची मार्केटिंग होईल. दरम्यान या प्रकल्पात सूती साडीला जकाटची बाॅर्डर करण्याचे काम सुरू आहे. ते झाल्यास ही साडी केवळ ४०० रुपयांत उपलब्ध होईल.
या साडीची किंमत बाहेर दोन ते तीन हजार रुपये आहे. परंतु ही साडी गरीब व मध्यमवर्गीय महिलांना केवळ ४०० रुपयांत उपलब्ध केली जाईल. त्यातही विनकरीचे काम करणाऱ्या महिलेला ६० रूपये प्रति साडी मजूरी, १० रुपये ट्रस्टच्या खात्यात जाईल. या प्रकल्पामुळे पून्हा नागपूरसह विदर्भाला सूती हातमाग व पाॅवरलूम साडीची ओळक देण्याचा प्रयत्न असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
ॲग्रोव्हिजनसाठीच्या इमारतीतून सर्वांगिन विकासाचा प्रयत्न
ॲग्रोव्हिजनसाठी तयार होणाऱ्या सहा मजली इमारतीत कृषी प्रयोगशाळा, शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठीचे प्रशस्त व संगणकीय साधनांनी सुसज्ज सभागृह, सेंद्रीय फळ व धान्याचा मोठा बाजार, फुट कोर्ट, वाहन तळ, खासदार सांस्कृतिक महोत्सव, विदर्भ ॲडव्हांटेजसह इतरही विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांचे कार्यालयासह इतरही सोय- सुविधा राहणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. येथे नवीन संस्थांनाही सामाजिक उपक्रमासाठी सभागृहासह इतरही सोयी उपलब्ध करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
साड्या जगभर पोहोचाव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.