नागपूर: एकेकाळी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात माझ्यासह त्यावेळच्या जनता पार्टी, संघाचे लोक निवडणुकीत मत मागायला गेल्यास नागरिक आमच्यावर दगडफेक करायचे, अशी मगिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या अमृतयोग विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी वनामती सभागृहात झाले. याप्रसंगी गडकरी बोलत होते. ते आणखी काय बोलले ते आपण बघू या.

कार्यक्रमाला मंचावर मंचावर नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक शैलेश पांडे, उदयभास्कर नायर उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून होणारा त्रास, आणीबाणी व अशार अनेक संघर्षातून ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राचा ७५ वर्षांचा प्रवास यशस्वी झाला. तरुण भारतला संघर्ष, बलिदानाचा मोठा इतिहास आहे. साप्ताहिकापासून सुरू झालेला तरुण भारताचा प्रवास आता दैनिकाद्वारे सुरू आहे.

महात्मा गांधी यांची हत्या, काँग्रेस काळात लागलेल्या आणीबाणीनंतर तरुण भारतासह संघावर मोठे संकट आले. अनेकांना कारागृहातही जावे लागले. यावेळी लिखाणावर बंदी आली. परंतु कुणीही वैचारिकदृष्ट्या तडजोड केली नाही, राष्ट्रवादी विचार सोडले नाहीत. अनेक पिढ्यांपर्यंत हा संघर्ष कायम राहिला. १९७७ साली जनता पार्टीकडून निवडणुकीचे व्यवस्थापन मी हाती घेतले. यावेळी तरुण भारत, संघ, जनता पार्टीबाबत सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून नागरिकांमध्ये प्रचंड द्वेष पेरला जात होता. त्यामुळे कुठेही मत द्या म्हणून आवाहन केल्यास आमच्यावर दगडफेक व्हायची. आम्हाला पळून जावे लागायचे. संघ शाखा व तरुण भारत कार्यालयांवर हल्लेही झाले. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष झाला. त्यात तरुण भारताची भूमिका महत्वाची होती. तरुण भारतने व्यावसायिक विचार कधी केला नाही. नि:स्पक्ष पत्रकारिता केली. म्हणूनच तरुण भारताचे अग्रलेख इतर विचाराचेही लोक आवर्जुन वाचतात, असेही गडकरी म्हणाले.

पूर्व नागपुरातील दगडफेक…

पूर्व नागपूर क्षेत्रात यंदा लोकसभा निवडणुकीत मला सुमारे १ लाख मतांची लीड मिळाली. कृष्णा खोपडे यांना येथून ८० हजारांची लीड मिळाली. परंतु एके काळी येथे आम्ही मत मागायला लाऊड स्पीकरवर आवाहन केल्यास लोक दगड मारायचे. तेव्हा काँग्रेसने नागरिकांमध्ये संघ, आमच्याबाबत खोटी माहिती व द्वेष पेरले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

आताचा काळ आनंददायी

तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसने पेरलेल्या द्वेषामुळे अनेकदा अपमान सहन करावा लागायचा. सातत्याने अपयश यायचे. टिंगल- टवाळी केली जायची. परंतु संघाचे स्वयंसेवक, विविध वैचारिक संघटनांनी केलेल्या मेहनतीच्या बळावर आज आपल्याला आनंददायी काळ बघायला मिळत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.