नागपूर: जागतिक योग दिनाचे औचित्यसाधून महापालिकेच्यावतीने शनिवारी २१ जून रोजी येथील यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी सहा वाजता झालेल्या या कार्यक्रमाला नागपूरकरांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. विशेष म्हणजे कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप आमदार प्रवीण झटके, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खोंडवे, महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी, जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे सदस्य यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिके झाली. गडकरी यांनी खुर्चीवर बसून योगासने केली. खुद्द गडकरीच योगासने करताहेत म्हंटल्यावर व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारी व इतरांनीही प्रात्याक्षिकात सहभाग नोंदवला. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ही या कार्यक्रमाची संकलपना होती. या संपूर्ण कार्यक्रमात पूर्णवेळ गडकरींचा सहभाग होता. अत्यंत प्रसन्नता त्यांच्या चेह-यावर होती .
योगदिनाचे यंदाचे बारावे वर्ष. प्रत्येक वर्षी गडकरी या कार्यक्रमात सहभागी होतात. नागपूरकरांना योगाचे महत्त्व सांगतात. यातून योग प्रसाराचा सकारात्मक संदेश नागपूर करांमध्ये जातो. त्यामुळे दरवर्षी महापालिकेच्या योगदिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी होते.