नागपूर : दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे, त्यांनी परवानगी दिली नाही, तरीदेखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा तेथेच होत असतो आणि याहीवेळी होणार, असे आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथे शनिवारी निक्षून सांगितले.
दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असतो, हे तमाम महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा कुणी हायजॅक करू शकत नाही. या गद्दारांना निमित्त हवं असतं आणि त्याच्याच शोधात ते असतात. परवा सत्ताधारी पक्ष निर्लज्जपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर होता.सत्ताधारी पक्षाला आपण कधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बघितलं आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.
हेही वाचा : आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी? वीज चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
खरं म्हणजे आमच्या शिव संवाद यात्रेला राज्यभर भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे खोके सरकार हादरलेले आहे. त्यामुळेच असले प्रकार करीत असल्याचे ठाकरे म्हणाले.हे खोके सरकार किती दिवस टिकेल, याचा नेम नाही. खरी शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहीत आहे, तमाम जनतेला माहिती आहे.
हेही वाचा : अकोला : पोलिसांच्या दबावामुळे युवकाची आत्महत्या?, मृत्यूपूर्वीची चित्रफित प्रसारित
जनता आमच्यासोबत आहे, गद्दारांसोबत नाही, हे सांगताना किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. शिवसेनेनं कुठलीही भूमिका सोडली नाही, शिवसेनेची भूमिका कायम आहे. ज्यांना ज्यांना आमचं हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील, असेही ठाकरे म्हणाले.