नागपूर : शहराला ‘स्मार्ट’ करण्यासाठी महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरी ते कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहर पहिल्या २० मध्ये राहील असे अपेक्षित होते. मात्र, गेल्यावर्षीचाच क्रमांक शहराने कायम राखला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहर यावर्षी देखील २७व्या क्रमांकावर आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. यात तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये नागपूर शहराचा ५२वा क्रमांक आहे. यावर्षी दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ४४ शहरांमध्ये नागपूरचा २७वा क्रमांक आहे. गेल्यावर्षी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात नागपूरचा ८६वा क्रमांक होता. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरात २७या क्रमांक होता. शहरात दोन खासगी कंपन्यांना कचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आले आहे. सुमारे सात हजार स्वच्छतादूत आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी अनेक आव्हाने असली तरीही यावर्षी या कामात बरीच सुधारणा झाली आहे. तरीही त्या तुलनेत मिळणारे गुण कमी आहेत. शहरातील जलसाठ्याची अवस्था अतिशय वाईट आहे.
अंबाझरीला जलपर्णीचा विळखा कायम आहे. फुटाळा तलाव, सोनेगाव तलावांची अवस्था वाईट आहे. त्यानंतरही या वर्गवारीत १०० टक्के गुण आहेत. भांडेवाडी क्षेपणभूमीत कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम ‘झिग्मा’ या कंपनीला दिले आहे. मात्र, याठिकाणी जुन्याच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम अजूनही व्यवस्थित होत नाही. अलीकडेच भांडेवाडी क्षेपणभूमीला मोठी आग लागली होती. त्यानंतरही याबाबतच्या वर्गवारीत १०० टक्के गुण आहेत.
कचरा संकलनात केवळ ३० टक्के गुण
प्रत्येक घरी जाऊन केल्या जाणाऱ्या कचरा संकलनात शहराला केवळ ३० टक्के गुण आणि कचरा विलगीकरणांत केवळ एक टक्के गुण आहेत. कचरा निर्मिती आणि त्यावरील प्रक्रियेत मात्र १०० टक्के गुण आहेत. कचराकुंड्यांच्या दुरुस्तीत ८१ टक्के गुण आहेत. निवासी क्षेत्रातील स्वच्छतेत १०० टक्के, व्यावसायिक क्षेत्रातील स्वच्छतेत १०० टक्के, जलसाठ्यांच्या स्वच्छतेत १०० टक्के गुण आहेत, तर सार्वजनिक शौचालय स्वच्छतेत ८० टक्के गुण मिळाले आहेत.
कमी गुणांना पालिकेने आव्हान द्यावे
यावर्षी नागपूरची कामगिरी तुलनेने चांगली आहे. गेल्यावर्षी ९ हजार ५०० पैकी ६१६४ गुण मिळाले होते, म्हणजेच एकूण गुणांची टक्केवारी ६४.८ टक्के होती, तर यावर्षी नागपूरला १२ हजार ५०० पैकी ९३२८ गुण मिळाले आहेत. म्हणजेच एकूण गुणांची टक्केवारी ७४.६ टक्केपर्यंत वाढली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कचरा विलगीकरणात फक्त एक टक्के, घरोघरी कचरा संकलनात ३० टक्के गुण मिळाले, ज्यामुळे मूल्यांकन आणि मार्किंग पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. या दोन्ही निकषांमध्ये कमी गुणांना पालिकेने आव्हान द्यावे, असे स्वच्छ भारत मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर कौस्तुभ चॅटर्जी यांनी सांगितले.