अमरावती : गेल्या आठवड्यात शनिवारी, रविवारी चिखलदरा येथे पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला, पण आता पावसाअभावी पर्यटकांनीही चिखलदऱ्याकडे पाठ फिरवली आहे. शनिवारी पर्यटकांची संख्या रोडावलेली दिसून आली. रविवारी दुपारपर्यंत चिखलदऱ्यात कमी प्रमाणात पर्यटक पोहचले होते.
गेल्या शनिवारी तसेच रविवारी चिखलदऱ्यात झालेल्या प्रचंड गर्दीचे व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी पाहून पर्यटकांना धडकी भरली होती. त्यामुळे आज तुरळक पर्यटक चिखलदऱ्यात दिसून आले. काही पॉइंटसुद्धा ओस वाटत होते.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने चिखलदऱ्याच्या वातावरणात बदल झाला आहे. रिमझिम पाऊस, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, गार वारा असे वातावरण पर्यटकांना हवेहवेसे वाटते. परंतु सध्या तशी स्थिती नसल्याने सुटी असूनही पर्यटकांनी चिखलदऱ्याला येणे टाळले असावे, असे येथील हॉटेल्सच्या संचालकांचे म्हणणे आहे.
पर्यटकांची संख्या वाढत असल्याने पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारी येथे भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारचा हा बाजार आता दर गुरुवारी भरणार असल्याची सूचनासुद्धा देण्यात आली आहे.
गेल्या रविवारी चिखलदरा व परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीसह विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. चिखलदरा ते परतवाडा हे अंतर पार करायला साधारणतः एक तास लागतो, त्यासाठी मागील रविवारी अनेकांना तीन ते चार तास लागले होते. गेल्या शनिवारी, रविवारी सुमारे दहा हजारांवर वाहने चिखलदरा येथे पोहोचली होती. सहा ते सात किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर होता. सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस परतवाडा-चिखलदरा-परतवाडा ही वाहतूक एकमार्गी (वन-वे) वळण्याचा निर्णय घेतला होता.
या सर्व कारणांमुळे या आठवडा अखेरीस त्याचे परिणाम जाणवले. शनिवार आणि रविवारी दिवसभर चिखलदऱ्यात क्वचितच पर्यटक दिसत होते. मुख्य मार्गावर शांतता होती. यातच मागील सहा दिवसांपासून चिखलदऱ्यातही पावसाने दडी मारली आहे. त्याचाही फटका पर्यटकांची संख्या घटण्यावर झाला आहे. पर्यटकांची संख्या घटल्याचा मोठा फटका तेथील हॉटेल व्यावसायिकासह इतर व्यवसायांनाही बसला आहे.
गर्दीत दोन-चार तास अडकून पडण्यापेक्षा अनेकांनी आपले बेत बदलवीत अन्य पर्यटनस्थळांकडे मोर्चा वळविला. गेल्या रविवारी चिखलदऱ्यात गेलेल्या काही लोकांचे अनुभव ऐकून सुद्धा अनेकांनी आपला बेत रद्द केल्याचे बोलल्या जाते.