नागपूर : देशभरात पन्नास लाख कोटींची कामे केली आणि आज हिमतीने व स्वाभिमानाने सांगू शकतो की एकाही कंत्राटदाराला माझ्याकडे कधीही कंत्राट मंजूर करण्यासाठी यावे लागले नाही आणि पुढेही यावे लागणार नाही. मी भ्रष्टाचार होऊ दिला नाही आणि देशभरात काम करताना संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवली, त्यामुळे माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पैसा कमविणे चूक नाही, मात्र भ्रष्टाचार हा त्यासाठी मार्ग नाही. राजकारण हे पैसे कमविण्याचे साधन होऊ शकत नाही, तर समाजकारण आणि विकास कारणासाठी आहे. आता वेळ आली आहे की राजकारणाची व्याख्या बदलविली पाहिजे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. हेही वाचा - अमरावती : चड्डी बनियनवर ‘तो’ शिरला महिलेच्या खोलीत; पतीने हाकलल्यानंतर मारण्यासाठी धावला नऊ वर्षांपासून वेगवेगळ्या विभागांचा मंत्री असून रस्त्यासह पायाभूत सोयीशी संबंधित विविध विभाग सांभाळले आहे. या सर्व क्षेत्रात मी ५० लाख कोटींची कामे केली आहे, मात्र पारदर्शकता ठेवून आणि कुठेही भ्रष्टाचार होऊ दिला नाही. एकाही कंत्राटदाराला घरी बोलावून कामे दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.