अकोला : मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणे, मुंबईची यंत्रणा वेठीस धरणे, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात दहशत निर्माण करून झुंडशाहीच्या जोरावर आरक्षण मिळत नसते, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लगावला. सरकारने आमचे सर्व आरक्षण संपवून जरांगेंना देऊन टाकावे, अशी उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके एका कार्यक्रमानिमित्त अकोला येथे आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरक्षण मागून मिळत नसते. या व्यवस्थेमध्ये मागास जातीमध्ये जन्माला आले, त्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षण दिल्या गेले आहे. हे मूळ तत्व जोपर्यंत जरांगेंना समर्थन करणाऱ्या खासदार, आमदारांना कळणार नाही, तोपर्यंत अशा जबाबदार व बेदखल मागण्या होत राहतील.

ओबीसींवर वर्षांनुवर्षे आर्थिक व सामाजिक अन्याय होत आहे. हे अनेक वर्षांपासून सहन करत आलो आहोत. आता सरकारने जनागेंना पाटलांना ओबीसींचे आरक्षण देऊन द्यावे, आम्हाला असे आरक्षण नको आहे, असे उद्विग्न भावनेने बोलत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगेंच्या बैठका या सरकार पुरस्कृत आहेत. ही राज्यकर्ते पुरस्कृत झुंडशाही असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. मनोज जरांगेंना या बैठकांसाठी एका मतदारसंघातून आमदार १० ते १५ लाख रुपये देतात. यामुळेच मराठवाड्यातील छोट्या-छोट्या गावातही जरांगेंची मोठं-मोठी फलक लावले जात आहेत. ओबीसींचे आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांकडून आता अपेक्षा राहील नाही. केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार आहे, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

‘अमोल मिटकरी टुकार’

‘टीका करणारे अमोल मिटकरी टुकार आहेत, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टिकेला चोख प्रत्युत्तर दिले. अमोल मिटकरी कधी ओबीसींच्या आंदोलनात दिसले नाही. सभागृहात देखील त्यांनी ओबीसींचे प्रश्न उचलले नाही. अमोल मिटकरींची ओळख म्हणजे थिल्लरपणा अशी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकवेळा त्यांची कानउघाडणी केली. त्यांच्या मुलाने देखील धारेवर धरले आहे. ते काय आम्हाला सल्ले देणार? अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.