नागपूर : साहित्य अकादमी ही सरकारी अनुदानावर चालणारी संस्था असली तरी तिचे स्वरूप स्वायत्त आहे. परंतु, मागच्या काही वर्षांपासून या स्वायत्ततेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. प्रख्यात मल्याळम लेखक सी. राधाकृष्णन यांनी या वर्षीच्या अकादमी महोत्सवाचे उद्घाटन एका केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते झाल्याच्या निषेधार्थ सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

साहित्य अकादमीचा प्रदीर्घ आणि गौरवशाली इतिहास राहिला आहे. ही संस्था याआधी कधीही राजकीय वर्चस्वाला बळी पडली नाही. परंतु, मागच्या काही वर्षांपासून हे चित्र बदलले असून अकादमीचा कारभार केंद्र शासनाकडून संचलित होत असल्याचे अनेक घटनांवरून पुढे आले आहे. सी. राधाकृष्णन यांनीही आपल्या राजीनाम्यात अशाच घटनांकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा >>>‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

या पत्रात ते म्हणतात, याआधीही एक केंद्रीय मंत्री संस्थेच्या वार्षिक उत्सवात सहभागी झाले होते तेव्हा अकादमीच्या सर्व सदस्यांनी निषेध केला होता आणि त्यानंतर असे आश्वासन देण्यात आले होते की अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही. परंतु, पुन्हा तेच घडले. यंदाच्या ‘साहित्योत्सव: द फेस्टिव्हल ऑफ लेटर्स’चे उद्घाटन सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले. हे योग्य नाही. ही साहित्यिकांची संस्था आहे. मी कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. माझा विरोध सांस्कृतिक संस्थेच्या राजकीयकरणाविरोधात आहे. ललित कला अकादमी आणि संगीत नाटय अकादमीने आधीच त्यांची स्वायत्तता गमावल्याचा आरोपही राधाकृष्णन यांनी राजीनामापत्रात केला आहे.

अकादमीकडून आरोपांचे खंडन

अकादमीने सोमवारी संध्याकाळी एक निवेदन प्रसिद्ध करून मल्याळम लेखक सी. राधाकृष्णन यांच्या आरोपांचे खंडन केले. राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यामधील माहिती दिशाभूल करणारी असून ्नराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे स्वत: एक लेखक आहेत. त्यांना राजस्थानी आणि हिंदी भाषेचे चांगले ज्ञान आहे, असा खुलासाही या निवेदनात करण्यात आला आहे.

याआधीही नामांकन प्रक्रिया बदलण्याची सूचना

मागच्या वर्षी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने अकादमीला पत्र पाठवून ‘भाषा सन्मान’ या मुख्य पुरस्कारासाठीची नामांकन प्रक्रिया बदलण्याची सूचना केली होती. सरकारने अशी सूचना करणे म्हणजे अकादमीच्या स्वायत्ततेच्या दृष्टीने धोक्याची पहिली घंटा आहे, असा आरोप तेव्हाही काही सदस्यांनी केला होता. आता पुन्हा मेघवालांच्या उपस्थितीने दुखावलेल्या सी. राधाकृष्णन यांच्या राजीनाम्याने संस्थेच्या राजकीयकरणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.