नागपूर : व्याघ्रप्रकल्पाच्या ५०व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. ‘कॅमेऱ्या ट्रॅप’च्या मोजणीतून समोर आलेली वाघांची संख्या ३,१६७ होती. आता ‘नॉन कॅमेरा ट्रॅप’ची आकडेवारीही जाहीर करण्यात आली असून देशात ३,६८२ वाघ असल्याचा अंदाज आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.

व्याघ्रसंवर्धनात गेल्या ५० वर्षांत भारताने लक्षणीय कामगिरी केली आहे. सुरुवातीला १८ हजार २७८ चौरस किलोमीटरमध्ये नऊ व्याघ्रप्रकल्प होते. आता ७५ हजार ७९६ चौरस किलोमीटरमध्ये ५३ व्याघ्रप्रकल्प आहेत. हे क्षेत्र देशाच्या एकूण भूभागाच्या २.३ टक्के एवढे आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ देशात आहेत. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने नुकतेच वाघांच्या क्षेत्रातील ‘कॅमेरा ट्रॅप’ आणि ‘नॉन कॅमेरा ट्रॅप’मधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. यातून देशात तीन हजार ६८२ वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संख्यावाढ कुठे?

मध्यभारत, शिवालिक हिल्स आणि गंगेच्या खोऱ्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली आहे. पश्चिम घाटासारख्या काही प्रदेशांत मात्र वाघांच्या संख्येत घट झालेली आढळली. या भागात देखरेख आणि संवर्धनाबाबत त्रुटी आढळल्या.

मिझोरम, नागालँड, झारखंड, गोवा, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसह काही लहान राज्यांमध्ये वाघांची संख्या चिंताजनक आहे. सुमारे ३५ टक्के व्याघ्रप्रकल्पांमध्ये व्याघ्र संरक्षण तातडीने आणखी मजबूत करावे लागणार आहे. त्यांच्या अधिवासातही वाढ करावी लागणार आहे. पर्यावरणपूरक विकासावर अधिक भर द्यावा लागणार असून खाणकामांचे व्याघ्र अधिवासावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी खाणींचे इतर ठिकाणी पुनर्वसन आवश्यक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याशिवाय संरक्षित क्षेत्राचे व्यवस्थापन मजबूत करणे, शिकारविरोधी उपाययोजना प्रभावीपणे राबवणे, मानव-वन्यजीव संघर्षांला प्रतिबंध करणे आदी पावले तातडीने उचलावी लागणार आहेत. देशातील व्याघ्र प्रकल्पांनी गेल्या पाच दशकांत व्याघ्रसंवर्धनात मोठी प्रगती केली असली तरीही शिकारीसारखी आव्हाने अद्याप आहेत.

कॉर्बेट व्याघ्रप्रकल्पात साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक व्याघ्रदिनी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी हा तपशिलवार अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभाग तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

वाघ जेरबंद

पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील दिघोरी नियत क्षेत्रातील ठाणेवासला पिपरी देशपांडे, गोवर्धन, दिघोरी, नवेगाव मोरे परिसरात धुमाकूळ घालून पाळीव जनावरांना ठार मारणाऱ्या वाघास जेरबंद करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून नवेगाव मोरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये या वाघाने धुमाकूळ घातला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक मध्य प्रदेशात

वाघांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात, ७८५ इतकी आहे. कर्नाटकात ५६३, उत्तराखंडमध्ये ५६० आणि महाराष्ट्रात ती ४४४ आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वाधिक वाघांची संख्या कॉर्बेटमध्ये २६० एवढी आहे. तसेच बंदीपुरात १५०, नागरहोलमध्ये १४१, बांधवगड येथे १३५, दुधवामध्ये १३५, मुदुमुलाईत ११४, कान्हात १०५, काझिरंगामध्ये १०४, सुंदरबनात १००, ताडोबा येथे ९७, सत्यमंगलममध्ये ८५ आणि पेंच मध्यप्रदेश येथे ७७ वाघ आहेत.