लोकसत्ता टीम

नागपूर : भाजपच्या नेत्या सना खान यांचा मृतदेह अद्यापही सापडलेला नसून त्याचा शोध सुरूच आहे. हिरन नदीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांकडून मृतदेहाबाबत काही तरी माहिती यावी यासाठी नागपूर पोलिसांना आता एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जो व्यक्ती मृतदेहाबाबत माहिती देईल त्याला ही रक्कम देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहूने २ ऑगस्ट रोजी सना यांची हत्या केल्यावर त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकला.

त्यानंतर साहूचा मित्र धर्मेंद्र यादव याच्या सांगण्यावरून त्याचा कमलेश पटेलने सना खान यांचे मोबाइल नर्मदा नदीत फेकले. पोलिसांनी अमित साहूसह धर्मेंद्र यादव, कमलेश पटेल, रब्बू यादव या आरोपींनादेखील अटक केली. तसेच मध्यप्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार संजय शर्मा यांची चौकशीदेखील झाली. मात्र अद्यापही सना यांचा मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांना अमित साहू व आरोपी दिशाभूल करत असल्याचादेखील संशय आहे. त्यामुळेच त्याची नार्को चाचणी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.

आणखी वाचा-अबब! तब्बल २७ गावठी बॉम्‍ब सापडले; अचलपूर तालुक्‍यात कशासाठी आणली होती स्फोटके? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे मानकापूर पोलीस ठाण्याची दोन पथके अद्यापही मध्यप्रदेशमध्ये असून ते स्थानिक पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेत आहेत. आरोपींना शिक्षा होण्यासाठी मृतदेह किंवा इतर महत्त्वाचे पुरावे सापडणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हिरन नदी व आजुबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत बक्षीसाबाबतची माहिती पोहचविण्या येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.