चंद्रपूर: आयपीएल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होताच पोलीस विभागाने ऑनलाइन क्रिकेट जुगारावर कारवायांचा धडाका सुरू केला. मात्र, तो औटघटकेचाच ठरला. सध्या चंद्रपूर शहरात क्रिकेट जुगार राजरोसपणए सुरू आहे. व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, विविध शासकीय विभागांतील अधिकारी, बँक अधिकारी व कर्मचारी यांसोबतच राजकीय पक्षाचे पदाधिकारी ऑनलाइन क्रिकेट जुगारात गुंतले आहेत. नीरज माखिजा, महेश अल्लेवार आणि राजीक शेख यांच्यासह अनेक ‘बुकी’ उघडपणे हा व्यवसाय करीत आहेत. शहरातील हाॅटेल, मद्यालये, ताडोबातील रिसॉर्ट आणि काही ‘क्लब’ या क्रिकेट जुगाराचे मुख्य केंद्र बनले आहेत.

. या व्यवसायात अगदी सुरुवातीपासूनच माखिजा, अल्लेवार व शेख यांच्या स्वतंत्र चमू सक्रिय आहेत. माखिजा आधी रघुवंशी संकुलातील ‘स्नॅक्स’नामक मद्यालयातून हा व्यवसाय चालवायचा. त्याच्यासोबत अल्लेवार व शेख हे दोघेही सक्रिय होते. पोलिसांच्या कारवाईनंतर तिघेही सतर्क झाले.

दरम्यानच्या काळात तिघांनी दुबई, मलेशिया व बँकॉक असा विदेश दौरा केला. त्यानंतर तिघांनी पुन्हा व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्याकडे शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, शासकीय व बँक अधिकारी, सनदी लेखापाल, वकील यांच्यासोबतच राजकीय पक्षाचे पदाधिकारीही क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळतात. विविध राजकीय पक्षातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील या व्यवसायात गुंतलेले आहेत. वाहतूक व्यवसायाशी संबंधित एक युवा उद्योजक दररोज लाखो रुपयांचा जुगार खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोट्यांवर कारवाई, मोठ्यांना रान मोकळे

शहरातील अनेक हॉटेल्स, मद्यालये, रिसॉर्ट, क्लब, चहा-पान टपऱ्या या व्यवसायाचे मुख्य केंद्र आहेत. नागपूर मार्ग, कस्तुरबा मार्ग, मूल व बल्लारपूर मार्गावरील काही हॉटेल्स व रिसॉर्ट आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून ‘बुकीं’साठी आरक्षित आहेत. तेथूनच या सर्व बुकींचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. पोलीस दलाला याची कल्पना आहे. मात्र काही छोट्या बुकींवर कारवाई करायची आणि मोठ्यांना मोकळे सोडायचे, असाच काहीसा प्रकार येथे सुरू आहे.