|| राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावात नसलेल्यांची नावे यादीत :- निवडणूक आयोगाकडून मतदारांची नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा करण्यात आली, परंतु या सुविधेचा लाभ बोगस मतदार नोंदणी करवून घेण्यासाठी होत असल्याचे आढळले आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कामठी आणि हिंगणा मतदारसंघात अशा शेकडो बोगस आणि दुबार मतदारांची यादी ‘लोकसत्ता’ला प्राप्त झाली आहे.

कामठी विधानसभा मतदारसंघातील बिडगाव ग्रामपंचायत अंतर्गत एका व्यक्तीचे दोन मतदान केंद्राच्या यादीत नावे आढळून आली. येथे ग्रामपंचायत निवडणुकीत एका व्यक्तीने दोनदा मतदान केले होते. तसेच मृत व्यक्तींनी देखील मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बिडगाव ग्रामपंचायतीमध्ये एका व्यक्तीचे नाव २५३ मतदान केंद्र यादीतआणि मतदार क्रमांक ३२३ आहे. तसेच २५७ मतदान केंद्र यादीत मतदार क्रमांक ९४३ आहे. अशाप्रकारे दोन मतदान केंद्राच्या यादीत १८५ व्यक्तींची नावे आहेत.

एका मतदाराचे दोनदा एकाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये नाव असल्याचे निदर्शनास आले आहे. हे मतदार दोनदा मतदान करून निवडणूक प्रभावित करीत आहेत. यापूर्वी देखील बिडगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अशाच बोगस मतदानामुळे निवडणूक प्रभावित झाल्याचे आढळले. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मृत व्यक्तींनी तसेच एकाच व्यक्तीने दोनदा मतदान केल्याची प्रतिनिधींच्या यादीवरून दिसून आले. नागपूर जिल्ह्य़ात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका दुबार मतदार आणि मृत मतदारांमुळे प्रभावित होऊ नये. यासाठी तातडीने बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी, अशी मागणी कामठी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी केली.

ग्रामपंचायत चिकणा (बोरगाव) येथे विधानसभा निवडणुकीत ९१ मतदारांची पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत हे कोण आहे, याबद्दल गावातील लोकांना माहिती नाही. या गावातील सरपंचाने ही बाब लक्षात आणून दिली. परंतु ही नावे वगळण्यात आली नाही. तसेच ग्रा.पं. वरंबा येथील मतदार यादीतील भाग क्रमांक ४७९ येथे ४० बोगस आणि गावात न राहणारे मतदार समाविष्ट आहेत.

बोगस नोंदणी कशी होते

निवडणूक आयोगाच्या अ‍ॅपद्वारे मतदार नोंदणी केली जाते. त्यासाठी कोणतेही एक ओळखपत्र आणि रहिवासी पत्ता  याची सत्यप्रत जोडावी लागते. ती सुद्धा ऑनलाईन असते. संबंधिताने अपलोड केलेला रहिवासी पत्ता बनावट असल्याची शहानिशा करणे शासकीय यंत्रणेने आवश्यक असते. परंतु ती योग्यप्रकारे केली जात नसल्याने बोगस मतदार मोठय़ा प्रमाणात कामठी विधानसभा मतदारसंघात सापडले. हे बोगस मतदान कोणाच्या फायद्याचे ठरत आहे. याच्या मुळाशी गेल्यास बोगस नोंदणीचे मूळ शोधणे सहज शक्य आहे. परंतु अद्याप  यादीतून बोगस नावे वगळण्यात आली नाहीत. तसेच अशी नोंदणी कोणी आणि कुठून केली याचा शोधण्याचा प्रयत्न झालेला नाही.

‘‘ग्रामीण भागात लोकांचा एकमेकांचा परिचय असतो. तेथील मतदार यादीत अनोळखी नावांचा समावेश असेल तर ते प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.’’ – रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी, नागपूर

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online voter registration bogus akp
First published on: 22-11-2019 at 04:13 IST