नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) प्राणवायू नलिकेला मंगळवारी दुपारी गळती लागल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाने प्राणवायू पुरवठा बंद केला गेला. या घटनेमुळे शल्यक्रिया गृह ‘ड’ मधील शस्त्रक्रिया तब्बल अडीच तास ठप्प पडल्या. यावेळी शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर काय घडले याबाबत आपण जाणून घेऊ या.
आशियातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपुरातील मेडिकल रुग्णालयाची ख्याती आहे. मेडिकलमध्ये हवेतून प्राणवायू तयार करणारे तीन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाजवळच एनआयसीयू, पीआयसीयू, शल्यक्रिया गृह ब तयार करण्यात येत आहे. त्यानिमित्त येथे कंत्राटदारांचे काम सुरू आहे. हे काम करताना निष्काळजीपणे काम केल्यामुळे प्राणवायूची मध्यवर्ती लाईन फुटली. प्राणवायू पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे ऑक्सिजन गळती सुरू झाली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. दुपारच्या सत्रात हा प्रकार घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियांवर परिणाम झाला नाही, मात्र ऑपरेशन थिएटर- ‘डी’ मध्ये झालेल्या एमर्जन्सी शस्त्रक्रियेसह कान-नाक-घसा विभागातील काही चालू शस्त्रक्रियाही थांबल्याची सूत्रांची माहिती आहे.
मेडिकल प्रशासनाचे म्हणणे काय ?
मेडिकल रुग्णालयातील प्राणवायू गळतीच्या वृत्ताला एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. परंतु रुग्ण सेवेवर परिणाम झाला नसल्याचाही दावाही या अधिकाऱ्याकडून केला गेला. घटनेनंतर झटपट कारवाई करून प्राणवायू नलिका दुरूस्त केल्याचाही प्रशासनाचा दावा आहे. तर शस्त्रक्रिया सुरू असलेल्या रुग्णाला नलिकेतील प्राणवायू बंद पडल्यावर लहान सिलेंडर द्वारे प्राणवायू दिले गेले. परंतु मेडिकलमध्ये यापूर्वीही प्राणवायू गळतीचे काही प्रकरण झाले असल्याने वारंवार या पद्धतीने होणाऱ्या घटनेमुळे येथील रुग्णांचा जीव टांगणीला आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्राणवायू गळतीची यापूर्वीही घटना
मेडिकलच्या वार्ड क्रमांक १ मध्ये ११ जानेवारी २०२२ मध्ये प्राणवायूवर असलेल्या रुग्णांना प्राणवायू पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाजवळ पाईपलाईनला गळती लागली होती. त्यावेळी येथील रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पुढे आले होते. त्यावेळी प्राणवायूवरील रुग्णांना इतर वॉर्डात हलवण्यात आले. यामुळेच मोठा धोका टळला होता. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२२ रोजी मूत्रपिंड डायलिसिस युनिटमधील प्राणवायू पाईपलाईनचा व्हॉल्व बंद करताना ‘किल्ली’ निघाली होती. यामुळे ऑक्सिजन गळती सुरू झाली होती. लिकेज सुरू झाल्याने यावेळी रुग्णांना वॉर्ड क्रमांक ५१ मध्ये हलवण्यात आले होते.