Pahalgam Terror Attack Updates Today: शहरातील सॉफ्टवेअर डिझायनर असलेले स्वप्नील कांबळे आणि त्यांचे कुटुंब बैसरन व्हॅली बघायला गेले होते. मात्र, काही अंतरावर असतानाच अंधाधुंद गोळीबार सुरु झाला. प्रकार लक्षात येताच पत्नी व दोन मुलांचा हात पकडून जीव मुठीत घेऊन परत पळायला लागलो. डोळ्यासमोरच गोळीबार होताना बघितला. त्या घटनेतून सुखरुप बाहेर पडल्याबाबत विश्वासच होत नाही. कारण गोळ्यांचा तो आवाज आणि तेथील पर्यटकांची धावपळीचे चित्र अजुनही डोळ्यासमोरुन जात नाही, अशी प्रतिक्रिया स्वप्निल कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

(काश्मीरमध्ये नेमकं काय घडलं?) What happened in Pahalgam Kashmir April 2025

स्वप्नील कांबळे, पत्नी प्रीती, मुलगा रियांश आणि पुतणी एंजल असे चौघे जण श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. दिल्लीतून श्रीनगरमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. मंगळवारी सकाळी श्रीनगरमधून टॅक्सीने पहलगाम येथील बैसरन व्हॅली बघायला निघाले. बैसरन व्हॅलीची उंची जास्त असल्यामुळे तेथे खच्चरची व्यवस्था आहे. त्यामुळे स्वप्नील यांनी दोन खच्चर भाड्याने घेतले. एकावर पती-पत्नी तर दुसऱ्यावर मुलगा रियांश आणि पुतणी एंजल बसले होते. बैसरन व्हॅलीच्या पार्कींगजवळ थांबले.

कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी आणि मुलगा व पुतणी एकमेकांसोबत गप्पा करीत व्हॅलीच्या मार्गाकडे पायी जात होतो. जवळपास १५० मीटर अंतरावर व्हॅली असतानाच काहीतरी फुटण्याचा आवाज यायला लागला. एकाने फटाके फुटत असल्याची पुष्टी जोडली. त्यामुळे पुन्हा काही अंतर पार केले. मात्र, थोड्या अंतरावर असताना दहशतवादी अंधाधुंद गोळीबार करीत असल्याचे लक्षात आले. मी दोन्ही मुलांचे हात पकडले आणि पत्नीला घटनेची माहिती दिली. त्यामुळे दोघेही आम्ही मुलांसह जीव मुठीत धरुन पळायला लागलो.

गोंधळ आणि पळापळ

बैसरन व्हॅलीत जवळपास चार ते पाच हजार पर्यटक होते. गोळीबार होत असल्यामुळे एकाच वेळी सर्वांनी बाहेर जाण्याच्या रस्त्याकडे पळ काढला. काही अंतर पार केल्यानंतर मागे वळून बघितले असता अनेक पर्यटक (वृद्ध, महिला, मुले) जीव वाचविण्याच्या नादात पळायला लागले. गोळ्यांचा आवाज कानठल्या बसवत होता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. काही वेळातच बैसरन व्हॅली रिकामी झाली.

गोळीबारामुळे हादरलो

आमच्या डोळ्यासमोरच गोळीबार होत असल्यामुळे ही घटना मनात घर करून बसली आहे. आमच्या समोरच काही पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटनाचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे मी पूर्णतः हादरलो आहे, अशी प्रतिक्रिया स्वप्नील कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.