लोकसत्ता टीम

अकोला : अपघात व इतर कारणांनी मृत्यू झालेल्या अनोळखी मृतदेहांच्या अंतिम प्रवासात देखील दु:ख, वेदना टळत नाहीत. अकोल्यात अनोळखी मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाल्यास एक पराग गवई नावाचा ‘देवदूत’ धावून येतो. त्याने गत २० दिवसांत १५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे अनमोल कार्य केले आहे.

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांचे कार्य सुरू असते. गत २० दिवसात १५ अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत पराग हा त्यांचा वारस ठरला. अनोळखी मृतदेहांमध्ये युवकांसह वृद्धांचा समावेश आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत मनोज नंदागवळी (३५) यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ७५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह स्त्री रुग्णालयाजवळ आढळून आला. संतोषी माता मंदिराजवळ ६० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.

आणखी वाचा-यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, अशा आहेत तारखा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत भारतीय धर्म शाळा येथे २२ वर्षांपासून राहत असलेल्या रामेश्वर बाबूलाल सोनी (७५), ४० वर्षीय गणेश नामक व्यक्तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुना कॉटन मार्केट येथे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात ४० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. तसेच अकोट फाईल, एमआयडीसी, बाळापूर, पातूर, बोरगाव मंजू, शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत अनोळखी व्यक्तिंचे मृतदेह आढळून आले. सर्व अनोळखी मृतदेहांच्या नातेवाईकांचा पोलीस विभागाकडून शोध घेण्यात आला. मात्र, त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पोलीस विभागाने सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांना माहिती दिली. पराग गवई यांनी पुढाकार घेत १५ बेवारस मृतदेहांवर मोहता मिल मोक्षधाम येथे विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यात त्यांना मित्र परिवाराची देखील साथ लाभली.