नागपूर: रेल्वेगाड्यांमधील शयनयान (स्लीपर) डब्यांची संख्या कमी करून तृतीय श्रेणीच्या वातानुकूलित डब्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रवाशांनी नापसंती व्यक्त केली होती. नागपूर-मुंबई दुरान्तोमध्ये तर केवळ दोन शयनयान डबे होते. आता ही संख्या वाढवून सहा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी २२ नोव्हेंबर २०२३ पासून होणार आहे.
सध्या नागपूर-मुंबई दुरान्तोमध्ये २३ डबे असून यात थ्री टायरचे १५ आणि स्लीपरचे दोन डबे आहेत. सेकंड एसीचे तीन व फर्स्ट क्लासचा एक डबा आहे. या गाडीने सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. शयनयान डब्याचे भाडे ४९० रुपये प्रतिव्यक्ती तर एसी थर्ड एसीचे भाडे १३४० रुपये आहे.
हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस
पूर्वी या गाडीला आठ शयनयान डबे होते आणि नऊ थर्ड एसीचे डबे होते. पण मध्य रेल्वेने शयनयानचे सहा डबे कमी केले. त्यामुळे शयनयानचे केवळ दोन डबे उरल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना एसी थ्री टिअरचे भाडे परवडत नाही. म्हणून या गाडीत शयनयान डबे वाढवण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भातील वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. मध्य रेल्वेने अधिसूचना काढून शयनयानचे सहा डबे करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. २२ नोव्हेंबर २०२३ ला नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या आणि २३ नोव्हेंबरला मुंबईहून नागपूरला येणाऱ्या दुरान्तोमध्ये शयनयान डब्यांची संख्या वाढलेली असेल.
