अकोला : किटकजन्य आजाराचे थैमान घातले असून डेंग्यू, चिकन गुनिया आजाराचे असंख्य रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील एका सात वर्षीय चिमुकलीला डेंग्यूची लागण झाली. तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. किटकजन्य व साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये अचानक झपाट्याने वाढ झाल्याने पुणे येथील आरोग्य विभागाच्या पथकाने अकोल्यात दाखल होत आढावा घेतला.
पावसाचे पाणी सर्वत्र साचले आहे. या पाण्यामुळे किटक व डासांचा प्रादुर्भाव वाढला. किटकजन्य व साथीच्या आजाराचा वाढता उद्रेक अकोलेकरांच्या आरोग्याला बाधा निर्माण करणारा ठरला आहे. डेंग्यू, चिकुन गुनिया आणि मलेरिया सारख्या किटकजन्य आजारांचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्याचबरोबर तापसदृश आजाराच्या साथीनेही शहरात उद्रेक घातला आहे. घराघरात तापसदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत. अंगदुखी, डोके दुखी, ताप येणे, थकवा जाणवणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी, दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या तापसदृश आजाराच्या साथीच्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
शहरातील वाढत असलेला किटकजन्य आजाराचा उद्रेक लक्षात घेता पुणे येथील आरोग्य सेवा सहसंचालकांच्या कार्यालयातील चमूने अकोला जिल्ह्यात भेट देऊन आढावा घेतला. यामध्ये राज्य किटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, सहाय्यक संचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुळे यांचा समावेश होता. जिल्ह्यात डेंग्यू, चिकन गुनियाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येताच राज्यस्तरीय चमूने भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी अतुल शंकरवार, अधिकारी चव्हाण आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा हिवताप कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना किटकजन्य आजार नियंत्रणावर चमूने सूचना देण्यात आल्या. चमूने वैद्यकीय महाविद्यालयाला सुद्धा भेट दिली. रक्त, जल नमुने तपासणी, दैनंदिन किटकशास्त्रीय सर्वेक्षण ताप रुग्ण सर्वेक्षण अहवाल, सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचार आदींची तपासणी करण्यात आली आहे.
कार्यक्षेत्रामध्ये धुर फवारणी करणे, डास निर्मिती ठिकाणे नष्ट करणे, नष्ट न करता येणाऱ्या डास निर्मिती ठिकाणांमध्ये गप्पी मासे सोडणे, रुग्ण आढळून आलेले गावांमध्ये कार्यक्षेत्रामध्ये तत्काळ सर्वेक्षण आदी खबरदारी घेण्याच्या सूचनाही पथकाने दिल्या आहेत. राज्यस्तरीय चमूने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत डास व अळी घनता याची माहिती घेतली. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात सर्वेक्षण करून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.