चंद्रपूर : मंत्रीपदाचा ‘प्रसाद’ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनकडून ‘देवा’ला अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसन्न करण्यासाठी ‘व्यक्ती’पूजनाचे स्तोम सुरू आहे. यात सर्वपक्षीय प्रवास करून स्वगृही परतलेले आमदार किशोर जोरगेवार आघाडीवर आहेत. त्यांनी ‘देवा’ला प्रसन्न करण्यासाठी २२ ते २८ जुलैदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ आयोजित केला. या निमित्ताने स्वत: मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ जाण्याचा, तसेच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आणि त्यात आडकाठी ठरणाऱ्या स्वपक्षीय विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
जिल्ह्यातील एकाही आमदाराला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आतातरी मंत्रिमंडळात वर्णी लागावी, मंत्रिपदाचा प्रसाद मिळावा, यासाठी ‘देवाभाऊ’ला प्रसन्न करण्याचे प्रयत्न आमदारांकडून सुरू आहे. यात आघाडी घेत आमदार जोरगेवार यांनी, ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’त रक्तदान शिबीर, महाकाली मंदिरात महाआरती, वृक्षारोपण, योग शिबीर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व तथा इतर स्पर्धा, जीवन प्रवासावर चित्रप्रदर्शन, भाजप मेळावा, रोजगार मेळावा, शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वितरण, देहदान, कावड यात्रा, असे ३५५ हून अधिक सेवा उपक्रम राबवले. पालकमंत्री अशोक उईके, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार श्वेता महल्ले पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
या सप्ताहाचा चंद्रपूरकरांना काय लाभ झाला, याचे उत्तर खुद्द फडणवीस यांच्याकडेही नाही. जिल्ह्यातील जनता वीज केंद्राची राख व कोळसा खाणीचे प्रदूषण, आरोग्य समस्या, रस्त्यांवरील खड्डे, अमृत पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, अतिक्रमण, बेरोजगारी या समस्यांनी बेजार आहे. मात्र, आमदार जोरगेवार मंत्रिपदाच्या लालसेतून मुख्यमंत्र्यांना प्रसन्न करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांनी चंद्रपूरकरांना घरगुती वापराकरिता २०० युनिट वीज मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, उद्योगांना स्वस्त वीज, मुबलक पाणी, उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार, रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, गोंडवाना विद्यापीठ रद्द करून नागपूर विद्यापीठाशी संलग्न करणे, युवकांना व्यसनमुक्त करणे, अशी असंख्य आश्वासने दिली होती. त्यांना या आश्वासनांचा विसर पडला आहे. आता सात दिवसांच्या पूजनानंतर ‘देव’ प्रसन्न होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अमृता फडणवीस यांचाही सहभाग
‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’च्या निमित्ताने आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही सहभागी झाल्यात. त्यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ बेलपत्र अर्पण करण्यात आले.