नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा झाली असून आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे नागपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे आणि भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा होणार आहे.

या सभेसाठी नागपूर, भंडारा, गोंदिया येथून नागरिकांची दुपारपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना काळे कपडे घालून सभेच्या मैदानात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. मैदानात प्रवेश करायचा असल्यास काळे कपडे काढण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांना त्यांनी घातलेल्या काळ्या रंगाच्या टी शर्ट, टोपी आणि सॉक्स काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पोलीस तपास पथकाजवळ काळ्या कपड्यांचा खच लागला होता. या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मैदानात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. काळा रंगाचे कपडे असणाऱ्यांना ते काढण्यास सांगितले जात आहे.

हेही वाचा – महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !

हेही वाचा – भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, माजी खासदार कुमार केतकर यांचे परखड मत

या आधीही अनेकदा मोदींच्या सभेच्या ठिकाणी नागरिकांना काळे कपडे घालून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात भोपाळमध्ये झालेल्या सभेतही अशाच प्रकारे लोकांना काळे कपडे घालून मोदींच्या सभेच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे झालेल्या सभेमध्येही हाच नियम लागू करण्यात आला होता. मोदींच्या या सभेसाठी दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. सात अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तेरा पोलीस उपअधीक्षक, दोनशे पोलीस अधिकारी, तीन शिघ्र कृती दलाच्या तुकड्या, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, एक हजार ९०० पोलीस कर्मचारी व महिला पोलीस असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आले आहेत.