नागपूर : विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. परिणय फुके यांच्या आईच्या तक्रारीवरून त्यांच्या लहान भावाची पत्नी प्रिया फुकेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घरात येऊन नातवंडांना भेटायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी सुनेने केली. तसेच समाजमाध्यमांवरून बदनामी करण्याची धमकी दिली, अशी तक्रार परिणय फुके यांच्या आईने केली. या तक्रारीवरून प्रिया फुकेंविरोधात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तसेच प्रिया फुके यांच्या तक्रारीवरुन डॉ. रमा फुके यांच्या घरातील नोकर चिंटू गजभिये याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे आमदार परिणय फुकेंच्या घरातील कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यात पोहचल्यामुळे चव्हाट्यावर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणय फुके यांच्या आई डॉ. रमा रमेश फुके (६८, हिलटॉप) यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करताच अंबाझरी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रिया फुकेंविरोधात गुन्हा दाखल केला.
प्रिया यांचे लग्न रमा फुके यांचा लहान मुलगा संकेत यांच्याशी २०१२ मध्ये झाले होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. संकेत यांचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात वादाची ठिणगी पडली. प्रिया यांनी घर सोडले. रमा यांना नातवंडांची भेट घ्यायची इच्छा व्हायची, मात्र प्रिया यांनी दर महिन्याला पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. वेळोवेळी प्रियाला पैसे दिले.
मात्र, ती कधीही घरी येऊन सामान घेऊन जायची, असा दावा डॉ. रमा यांनी तक्रारीत केला. ६ मे रोजी सायंकाळी प्रियाने विनापरवानगी घरात प्रवेश केला व शिवीगाळ सुरू केली. मला पैसे दिले नाहीत, तर नातवंडांना भेटू देणार नाही. तसेच समाज माध्यमावर तुमची बदनामी करेन, अशी धमकी दिली, असा आरोप करीत डॉ. रमा यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अंबाझरी पोलिसांनी प्रियाविरोधात लगेच गुन्हा दाखल केला. दरम्यान, काही महिन्यांअगोदर प्रिया यांच्या तक्रारीवरून फुके कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी ‘या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून मी फक्त समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.’ असे आ. परिणय फुके यांनी स्पष्ट केले होते. ‘मी वाद शमविण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात यश आले नव्हते. हा वाद दूर व्हावा अशीच माझी इच्छा होती’ अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, आता डॉ. रमा फुके यांनीच सून प्रिया फुकेंविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
प्रिया यांच्याविरुद्ध ॲट्रासिटी
६ मे रोजी प्रिया फुके या सासूच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी घरातील नोकर चिंटू गजभिये याला प्रिया यांनी शिवीगाळ केली. तसेच जातिवाचक शब्दाचा उपयोग करुन अपमान केला, असा आरोप गजभियेने केला. त्याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी प्रिया यांच्याविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला तर प्रिया यांनीसुद्धा चिंटूविरुद्ध तक्रार दिली. त्यामुळे अंबाझरी पोलिसांनी चिंटूविरुद्धही गुन्हा दाखल केला.
परिणय फुकेंच्या आईच्या तक्रारीवरुन प्रिया फुकेंविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच चिंटू गजभियेच्या तक्रारीवरुनसुद्धा प्रियाविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. तसेच प्रिया यांच्या तक्रारीवरुन चिंटूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. – विवेक राऊत, ठाणेदार, अंबाझरी पोलीस ठाणे.
‘माझी तक्रार घेण्यास नकार’
६ मे रोजी मी अंबाझरी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध लेखी तक्रार दिली. मात्र, अंबाझरी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तक्रार घेण्याची विनंती ठाणेदारांना केल्यानंतरही तक्रार घेण्यात आली नव्हती. तक्रार अर्जसुद्धा घेण्यास नकार देणाऱ्या अंबाझरी पोलिसांनी माझ्याविरुद्ध मात्र सलग दोन गुन्हे दाखल केले. सासरच्या मंडळींनी मला घरी बोलावले होते म्हणून मी गेली होती. मात्र, तेथे गेल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशानेच माझ्याशी अशी वर्तवणूक करण्यात आली. चिंटू याला मी कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही. उलट तोच मला धक्का देऊन निघून गेला. मला न्यायालयाच्या आदेशाने घरी जाण्याचा हक्क आहे. त्यानुसारच मी दोन्ही मुलांना घेऊन गेली होती. मात्र, माझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला. – प्रिया फुके.