नागपूर : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशा हॉस्पिटलच्या बाजुला असलेल्या एस. फार्म नावाच्या फार्महाऊसवर व्यापाऱ्यांची ‘ड्रग्जपार्टी’सह तरुणींच्या डान्सवर पैसे उडविणे सुरु असतानाच पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात चार तरुणी ‘नको त्या अवस्थेत’ फार्महाऊसवर पार्टी करताना आढळल्या. पोलिसांनी चार पुरुष आणि चार तरुणींवर गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेतले. छाप्यात पोलिसांनी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शंकरलाल अग्रवाल (वय ६१, रा रामलक्ष्मी कॉलनी, कामठी) हे कामठी रोडवरील एस. फार्म नावाच्या फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अन्य व्यापारी मित्र गौतम सुशील जैन (वय ५१, रा रामदास पेठ, सीताबर्डी), निलेश बाबूलाल गडीया (वय ६१, रा कमल पॅलेस, रामदास पेठ, सीताबर्डी) आणि मितेश मनोहरलाल खक्कर (वय ५०, रा रामदास पेठ, सीताबर्डी) हे सुद्धा पार्टीसाठी उपस्थित होते. फार्महाऊसवर चार तरुणींनाही बोलाविण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर डीजेच्या मोठ्या आवाजावर ड्रग्ज, हुक्का यासह पार्टीला सुरुवात झाली. चारही तरुणी झिंगलेल्या अवस्थेत नृत्य करीत होत्या. तर चारही आरोपी तरुणींसोबत नृत्य करण्यात व्यस्त होते. दरम्यान, या ड्रग्जपार्टीची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यामुळे गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक चारचे पथक, अनैतिक मानवी वाहतूक विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक आणि स्थानिक पोलिसांनी फार्महाऊसवर छापा घातला. अंमली पदार्थाच्या धुंदीत सुनील अग्रवाल, गौतम जैन, मितेश खक्कर आणि निलेश गडीया हे तरुणींसोबत नाचत होते. चारही तरुणी हुक्का हातात घेऊन ‘नको त्या अवस्थेत’ आढळून आल्या. महिला पोलिसांनी चारही तरुणींना ताब्यात घेतले. तसेच अन्य चार पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तरुणींसह व्यापाऱ्यांना नवीन कामठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ड्रग्जसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
फार्महाऊसवरील छाप्यात पोलिसांनी ड्रग्जसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ५८ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ती रक्कम तरुणींवर उडविण्यात येणार होती, अशी माहिती आहे. १.३१ ग्रँम एमडी पावडर, दोन चारचाकी वाहने, हुक्का पॉट आणि हुक्कासाठी वापरण्यात येणारा फ्लेवरचा तंबाखू असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींची वैद्यकीय तापासणी करून त्यांचे विरुद्ध कलम ८(क), २१ (अ), २९ एन.डी. पी.एस कायदा सहकलम ४,(१), ५(१), २१ कोटपा कायदा अन्वये पो. ठाणे नवीन कामठी नागपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.