नागपूर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला बंदिवान यशवंत बाळू शिंदे (वय ३८) याच्याकडे दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पुड्यामध्ये सेलोटेप गुंडाळलेल्या अवस्थेत दोन पाकिटांमध्ये ४० ग्रॅम गांजा सदृश्य पोलिसांनी जप्त केला. नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धंतोली पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या डाव्या हातातल्या रुमालात प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवलेल्या दोन पुड्या सापडल्या.

पंचासमक्ष पोलिसांनी त्याची तपासणी केली असता तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील वकान तालुक्यातल्या खांबेश्वरी वाडी येथील रहिवासी यशवंत बाळू शिंदे हा अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत आहे. वैद्यकीय कारणास्तव त्याला सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर यशवंत शिंदेच्या डाव्या हातातील रुमालात प्लास्टिकच्या दोन पुड्या सापडल्या. याची लगेच धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस शिपाई सचिन कुंडलिकराव इंगळकर यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला.

मेडिकलमधूनच पुरवठा झाल्याची शक्यता

कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना कोणत्याही कारणासाठी पोलीस देखरेखीत कारागृहाबाहेर पाठवताना संपूर्ण झडती घेतली जाते. तेथून परतल्यानंतरही आत घेताना पुन्हा झडती होते. यशवंत शिदेला देखील हीच प्रक्रिया करून सोमवारी वैद्यकीय तपासणीसाठी कारागृहातून मेडिकलला पाठवले गेले. दुपारी तो तपासणी करून कारागृहात आल्यांतर कारागृह पोलीस झडती घेत असताना यशवंतच्या डाव्या हातातील रुमालात दोन पुड्या सापडल्या. त्यामुळे शिंदेला मेडिकलमध्येच कोणीतरी गांजा पुरवल्याचे स्पष्ट होत आहे. धंतोलीच्या पोलीस उपनिरीक्षक धनश्री रायकर त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.

अमरावती कारागृहात सापडले दोन भ्रमणध्वनी

या घडामोडीत अमरावती कारागृहातली सुरक्षा भेदून बराकीपर्यंत पोचलेले दोन भ्रमणदूरध्वनी आणि बॅटरी झडती दरम्यान सापडल्या. सश्र्म कारावासाची शिक्षा भोगत असलेले हे कैदी अमरावती कारागृहातल्या अंडा सेलमध्ये बंदी आहेत. तिथेच झडती दरम्यान बंदीवानांकडे हे फोन सापडले. सुरक्षा भेदून कारागृहात सापडेल्या या फोनची दखल घेत पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि तुरुंग अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी तातडीने बैठक घेत उच्चस्तरीय सुरक्षा समितीची स्थापना करत चौकशी सुरू केली आहे.