बुलढाणा : बुलढाण्यात जिल्हा पाेलीस अधीक्षक पदावरून निर्माण झालेल्या संगीत खुर्चीच्या मजेदार वादावर अखेर १७ ऑक्टाेबर राेजी संध्याकाळी पडदा पडला आहे. कॅटने तत्कालीन जिल्हा पाेलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची याचिका फेटाळल्याने आता नीलेश तांबे हेच पाेलीस अधीक्षक पदावर राहणार आहेत यावर अधिकृतरित्या शिक्कामाेर्तब झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) या प्रकरणावर सुनावणी सुरू हाेती. तसेच ८ सप्टेंबर राेजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला हाेता. अखेर या प्रकरणावर १७ ऑक्टाेबर राेजी कॅटने आपला निकाल दिला.

बुलढाण्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची २२ मे रोजी अमरावती एसआरपीएफ (गट क्रमांक ९) येथे बदली करण्यात आली हाेती. तसेच त्यांच्या जागेवर नागपूर येथील नीलेश तांबे यांची पाेलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली हाेती. पोलीस अधीक्षक पदी पहिलीच नियुक्ती असल्याने तांबे दीर्घ प्रवास करून मध्य रात्रीच्या सुमारास बुलढाणा गाठत पदाची सूत्रे स्वीकारली.

पानसरे मॅट मध्ये

दुसरीकडे आपल्या नियुक्तीला जेमतेम नऊ महिने झाले असतानाच बदली झाल्याने पानसरे यांनी कॅटमध्ये धाव घेतली हाेती. न्यायमूर्ती रंजित मोरे (अध्यक्ष, कॅट) यांच्या समोर हे प्रकरण तत्काळ सुनावणीसाठी घेण्यात आले . तारखावर तारीख होऊन या प्रकरणात ८ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली हाेती. अखेर १७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी निकाल देत नीलेश तांबे यांच्या बाजुने निकाल दिला आहे. त्यामुळे, बुलढाण्याच्या जिल्हा पेालीस अधीक्षकपदी आता नीलेश तांबे हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच पानसरे यांना बदलीच्या ठिकाणी रुजू हाेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.