नागपूर : गरीब चौकीदाराच्या कुटुंबाकडून विकत घेतलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला चटके देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणातील तिसरी आरोपी हिना खान हिच्या अटकेसाठी हुडकेश्वर पोलिसांचे पथक बंगळुरूला रवाना झाले आहे.

या प्रकरणात, हिनाचा पती अरमान खान आणि विकृत भाऊ अझहर शेख याला यापूर्वीच अटक झाली आहे. लवकरच क्रूर हिना पोलिसांच्या जाळ्यात असणार आहे. तिच्या अटकेनंतर बरेचसे चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा – नागपुरातील मनोरुग्णालयात अनोखी दहीहंडी, कुणी बनले कृष्ण, कुणी राधा तर कुणी गोविंदा

अरमानची पत्नी हिना ही सध्या २ वर्षांची आणि ८ महिन्यांच्या मुलींसह बेंगळुरूमध्ये माहेरी आहे. या प्रकरणाचा उलगडा होण्याच्या आधीपासून खान कुटुंब बेंगळुरूत गेले होते. दरम्यान अरमान परतताच नागपूर विमानतळाहून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा मेहूणा अझहर शेख याला जामिनासाठी धडपड करण्यासाठी न्यायालयात पोहोचल्यानंतर अटक केली. आता अरमानची पत्नी हिना हिच्या अटकेसाठी हुडकेश्वर ठाण्याचे एक पथक रवाना झाले आहे.

दरम्यान शिनाचे (काल्पनिक नाव) वडिल नागपुरात आले असून हुडकेश्वर पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले. त्यांनी शिनाला खान कुटुंबाकडे कशासाठी पाठविले? तिची विक्री केली का? मुलीसोबत कितीदा भेट झाली? शिनाने काही तक्रार केली होती काय? असे विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले. संपूर्ण जबाब नोंदविल्यानंतर ते बेंगळुरूला रवाना झाले. त्यांनी मुलीची विक्री केली असल्याचे अजूनही कबुल केले नाही, त्यामुळे शिना ही खान कुटुंबियांकडे कशी आली. तिला बळजबरीने आणले काय? आरोपींनी शिनाच्या वडिलांना दमदाटी-धमकी किंवा आमिष दिले का? याचा उलगडा करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. हिनाच्या उपस्थितीत १२ वर्षीय शिनावर अन्विनत अत्याचार केला जात होता. तिच्या अत्याचाराची हिनाला माहिती होती. हिनाने कुठल्याही प्रकारे विरोध दर्शविला नाही. त्यामुळे हिना तिचा पती आणि भावाच्या कटात सहभागी आहे, असे ग्राह्य धरून तिला अटक करण्यात येणार आहे.

वडिलांना बघताच मुलीने फोडला हंबरडा

करोनाच्या काळात सात मुलांचा सांभाळ करणे कठिण होत असल्यामुळे शिनाच्या वडिलांनी तिला हिनाच्या कुटुंबियांना घरकाम करण्यासाठी दिले होते. शिनाला नागपुरात आणल्यानंतर ती कधीच वडिलांना भेटली नाही. आई आणि बहिणीला तिने कधीच पाहिले नव्हते. कुटुंबासोबत केवळ ५ ते ६ महिन्यांतून एकदा मोबाईलवरच बोलू दिल्या जात होते. आज चार वर्षांनंतर प्रत्यक्षात वडिलांना समोर बघितले. तिच्या आनंदाला पारावार नव्हता. वडिलांना पाहताच तिने मोठ्याने हंबरडा फोडला. तर पश्चातापाच्या अग्नित जळणाऱ्या वडिलांचे डोळेही डबडबले होते.

हेही वाचा – चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक जयस्वाल, शहर कार्याध्यक्षपदी सुधाकर कातकर यांची नियुक्ती

‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ चे चौकशीचे आदेश

एका चिमुकलीला घरात कोंडून तिच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देणाऱ्या अटकेतील आरोपींना हुडकेश्वर पोलीस ‘व्हिआयपी ट्रीटमेंट’ देते होते. राठोड नावाचा पोलीस उपनिरीक्षक स्वत:चा मोबाईल आणि हॉटेलचे जेवन आणून देत होता. आरोपींना पाहुण्यांसारखी वागणूक दिल्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु, ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत अजूनही याबाबत असे घडलेच नसल्याचा दावा करीत आहेत.