यवतमाळ : पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील गोदणी मार्गावर असलेल्या ऑक्सीजन पार्क परिसरात गुरुवारी सकाळी घडली. अभिषेक दशरथ आडे (२७, रा. पोलीस मित्र सोसायटी, यवतमाळ) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अभिषेक यांचा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अभ्यास सुरू होता. शहरातील दारव्हा मार्गावरील पोलीस मित्र सोसायटीत अभिषेक आडे कुटूंबीयांसह राहत होते. गेल्या सात वर्षापूर्वी अभिषेक यांचे वडील दशरथ आडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तेव्हा ते शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर गेल्या चार वर्षापूर्वी अभिषेक हे अनुकंपात पोलीस शिपाई म्हणून रूजू झाले होते. अभिषेक अंगुली मुद्रा शाखेत कार्यरत होते. अभिषेक पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तयारी करीत असल्याने नेहमीप्रमाणे मित्रांसह गुरूवारी पहाटे शहरातील गोदणी मार्गावर असलेल्या ऑक्सीजनपार्कमध्ये धावण्याच्या सरावासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने मित्रांनी त्यांना तातडीने एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
हेही वाचा…मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
त्यानंतर अभिषेक यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. अभिषेक यांच्या मागे आई आणि एक लहान भाऊ आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.