राज्यात विजेच्या एकूण मागणीच्या तुलनेत अद्यापही पुरवठय़ात १३०० ते १६०० मेगावॅटची कमी असताना महानिर्मितीच्या कोराडीसह चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्पातील प्रत्येकी एक अशा १ हजार १६० मेगावॅटचे दोन संच तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यात ग्राहकांना जास्त प्रमाणात भारनियमनाचे चटके सहन करावे लागण्याचा धोका आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यात विजेची कसलीच कमी नसून कुठेही भारनियमन होणार नसल्याचा दावा वारंवार राज्यभरात दौरा करताना केला होता, परंतु गेल्या महिन्यात अचानक महानिर्मितीचे काही वीजनिर्मिती संच बंद पडताच राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात ५० टक्क्यांहून जास्त हानी असलेल्या वाहिन्यांवर भारनियमन सुरू झाले. ऊर्जामंत्र्यांकडून या भारनियमनाचे खापर अदानी व इंडियाबुल्स या खासगी वीजनिर्मात्या कंपन्यांवर फोडण्यात आले असले तरी त्यांच्याकडून वीज मिळवण्यात शासनच नापास झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच हल्ली राज्यात विजेच्या मागणीच्या तुलनेत पुरवठय़ात १३०० ते १६०० मेगावॅटची कमी आहे.
ही कमी भरून निघत नसतानाच गेल्या दोन दिवसात अचानक नागपूर जिल्ह्य़ातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या कोराडीतील ६६० मेगावॅटचा युनिट क्रमांक १० आणि चंद्रपूरचा संच क्रमांक ५ मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मिती बंद पडली. महानिर्मितीकडून कोराडीत बेल्ट अलायमेंट तुटल्यामुळे तर चंद्रपूरच्याही संचात कोळशातून ज्वाळा तयार होणाऱ्या प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे संच बंद झाल्याचे सांगत दुरुस्ती सुरू असल्याचे म्हटले जाते. त्यातच विजेची कमी पडू नये म्हणून महानिर्मितीने कोयनातील कमी झालेल्या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवली आहे. पाण्याअभावी हे संच लवकरच बंद होण्याची शक्यता असून कोराडी व चंद्रपूरचे हे दोन्ही संच त्वरित सुरू न झाल्यास राज्याला मोठय़ा प्रमाणावर भारनियमनाचे चटके सहन करावे लागण्याचा धोका आहे.