वीज प्रकल्पांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राज्याला  वीजपुरवठा करणाऱ्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पांकडून पर्यावरणाचे निकष पायदळी तुडवण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोराडी, खापरखेडा प्रकल्पांत पर्यावरणाचे निकष धाब्यावर

नागपूर : राज्याला  वीजपुरवठा करणाऱ्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पांकडून पर्यावरणाचे निकष पायदळी तुडवण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल हे मर्क्युरी, आर्सेनिक, अल्युमिनिअम, लिथिअम आदी सारख्या विषारी धातूंमुळे दूषित झाले असून प्रदूषणामुळे निर्माण झालेली ही धोकादायक परिस्थिती त्वरित बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मंथन अध्ययन केंद्र, असर आणि सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांनी कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास अहवाल गुरुवारी प्रकाशित केला. कोराडी आणि खापरखेडा वीजनिर्मिती प्रकल्प तसेच त्यांचे अॅश पाँड यांच्याद्वारे स्थानिक प्रवाह आणि कोलार व कन्हान नदीमध्ये निर्मिती प्रकल्पातील सांडपाणी थेट सोडले जात आहे. फ्लायअॅदश मिश्रित हे सांडपाणी ज्याठिकाणी सोडले जात आहे, अशा सहा ठिकाणांची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे. पावसाळ्यासह प्रत्येक मोसमातील पाण्याचे जवळपास सर्व नमुने हे ब्युरो ऑफ स्टॅण्डर्डने पिण्याच्या पाण्यासाठी आखलेले निकष व इतर संबंधित निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. पाण्याच्या कित्येक नमुन्यात मर्क्युरी, अर्सेनिक, लिथिअम, अल्युमिनिअम आदी विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पातळीच्या १० ते १५ पटीने अधिक आहेत. या अभ्यासादरम्यान भूपृष्ठावरील पाणी भूजल या दोन्हीमध्ये मोठय़ा प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षारता आणि विरघळलेल्या घनतत्त्वाचे अस्तित्व  आढळले. त्यासोबतच अॅमन्टीमॉनी, अल्युमिनिअम , आर्सेनिक, बोरोन, फ्लुरॉईड, आयर्न, मँगनीज, मॅग्नेशियम, मर्क्युरी, मॉलिबडेनम, लिथिअम, लेड आणि सेलेनिअम यांचे अस्तित्व मोठय़ा प्रमाणात दिसून आले. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल  स्थानिक वापरत असून त्याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत. महानिर्मिती आणि इतर नियंत्रण यंत्रणा हे प्रदूषण नियंत्रित करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेतच, पण स्थानिकांनी वारंवार या प्रश्नावर आवाज उठवला असताना आणि यंत्रणांकडे निवेदन दिले असतानाही त्याबाबत उदासीनता दाखवली जात आहे. अहवाल प्रकाशनासोबतच ही स्थिती मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंथन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्रीपाद धर्माधिकारी, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालक लीना बुद्धे, डॉ. समीर अरबट उपस्थित होते.

तिनही ऋतूंमध्ये सर्वेक्षण

हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूमध्ये परिसरातील पृष्ठभागावरील पाणी आणि भूजल तसेच वॉटर एटीएम अशा २५ ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. तसेच दोन्ही विद्युत निर्मिती प्रकल्प परिसरातील ऑश पाँड आणि काही  घरे अशा पाच ठिकाणांहून फ्लाय अ्ॅशचे नमुने जमा करण्यात आले. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. गावपाळीवर घरे आणि शेतकरी यांचे तपशीलवार सर्वेक्षण २१ गावांमध्ये करण्यात आले.

अहवालात सुचवलेल्या उपाययोजना

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने कालबद्ध उपाययोजनांवर नजर ठेवण्यासाठीची यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी. प्रदूषण पूर्णपणे नाहीसे होतपर्यंत वीजनिर्मिती प्रकल्पाचे कामकाज थांबवण्यासारखे कठोर निर्णय घ्यावे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरातील गावांचे प्रतिनिधी, सरपंच यासोबत नागरी संस्थांचे प्रतिनिधी व विषयातील तज्ज्ञ यांची समिती स्थापन करावी. कोराडी व खापरखेडा विद्युत प्रकल्पांनी प्रदूषण नियंत्रणत आणण्यासाठीच्या सर्व कायदेशीर तरतुदींची कठोर अंमलबजावणी करायला हवी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Power projects endangered citizens health ysh

Next Story
विजयी भव !