कस्तूरचंद पार्कवर खासगी कार्यक्रम
ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवर विविध कार्यक्रमांदरम्यान नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे उघड झाले आहे. वेळेची मर्यादा, आवाजाचे निकष, खाद्य पदार्थाची विक्री, नागरिकांची सुरक्षा आणि मैदानाची देखभाल दुरुस्ती याकडे आयोजक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येऊ लागल्या आहेत. .
कस्तूरचंद पार्कवर वर्षभर कोणते ना कोणते कार्यक्रम होत असतात, त्यात व्यावसायिक प्रदर्शन आणि मेळाव्यांचाही समावेश असतो. मैदान भाडय़ाने घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील नझूल विभागाची परवानगी घ्यावी लागते व त्यासाठी विशिष्ट रक्कम अनामत म्हणून जमा करायची असते. परवानगी देताना नझूल विभाग काही अटी टाकतो, त्यात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्राथमिक उपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा, रात्री दहा वाजतानंतर कार्यक्रम बंद करणे, मैदानावरील ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे, मैदान ज्या अवस्थेत ताब्यात घेतले तीच अवस्था सोडून जाताना कायम ठेवणे, यासह १०ते १५ अटींचा समावेश असतो. त्या मान्य करण्याचे आश्वासन आयोजक देतात. त्यानंतरच त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्याच बरोबर कार्यक्रमासाठी शुल्क आकारणी केली जात असेल तर त्यासाठी करमणूक कर विभागाची वेगळी परवानगी घ्यावी लागते.
प्रत्यक्षात या अटींचे पालन कार्यक्रमाचे आयोजक करीत नाहीत आणि ते होते किंवा नाही याची तपासणी करणारी यंत्रणा प्रशासनाकडे नाही. सणासुदीच्या काळात या मैदानावर विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीची दुकाने लागतात, गरबा, मनोरंजन मेळावे, विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यासह इतर कार्यक्रमही आयोजित केले जातात. या दरम्यान सामन्यपणे कार्यक्रम बंद करण्याची वेळ, मर्यादित आवाजाचे निकष, शुल्क आकारणी, खाद्य पदार्थ विक्रीचे नियम आयोजकांकडून पाळले जात नाहीत. ऐतिहासिक वास्तूंकडे कोणीच लक्ष देत नाही, उलट या वास्तूचा व्यावसायिक हितासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मैदानाच्या बाजूला असलेल्या संरक्षण दलाच्या तसेच दूरसंचार विभागाच्या कार्यालयाला मैदानावरील आवाजाचा त्रास होतो, ते आयोजकांकडे तक्रारही करतात, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ते तक्रार देत नाही म्हणून कारवाई केली जात नाही. मैदानाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यासाठी आयोजकांकडून पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. आयोजकांनी मैदानात खड्डे केले असेल किंवा तत्सम प्रकार झाले असेल तर ते भरण्यासाठी ही रक्कम खर्च केली जाते, मात्र हा विभाग आयोजकांनाच हे काम करण्यास सांगतो, ते थातूरमातूर करून मोकळे होतात, कालांतराने पुन्हा खड्डे उघडे पडतात. आतापर्यंत नझूल आणि करमणूक कर या एकाच कार्यालयातील दोन विभागात समन्वय नव्हता, आता मात्र नझूल विभाग तेथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती करमणूक कर विभागाला देऊ लागला आहे, त्यामुळे त्यांना करवसुलीसाठी सोयीचे झाले आहे. अलीकडेच एका संगणक प्रदर्शन भरविणाऱ्या संस्थेकडून दंडात्मक करवसुली करण्यात आली आहे.
असे आहेत नियम
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे
प्रथोमोपचाराची सोय करणे
आग प्रतिबंधक उपकरण लावणे
मैदानावरील ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे
रात्री दहा वाजेपर्यंतच कार्यक्रम सुरू ठेवणे
खाद्य पदाथार्ंच्या विक्रीसाठी वेगळी परवानगी घेणे