नागपूर : ‘झुंड’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचे नागपुरात वास्तव्य होते. यावेळी प्रियांशू क्षत्रिय ऊर्फ बाबू छेत्री याला अमिताभ बच्चन यांचा सहवास लाभला. परंतु, या दरम्यानही प्रियांशूकडून गुन्हेगारी कृत्य सुरूच होते. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वी प्रियांशूला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. तो सुधारला नाही आणि अखेर वाईट व्यसनांमुळे त्याला जीव गमवावा लागला.

जरीपटक्यात बुधवारी झालेल्या प्रियांशूच्या खुनामागे एमडीचे व्यसन हे कारण असल्याचे समोर येत आहे. प्रियांशू आणि त्याचा मित्र ध्रुव या दोघांनी आधी एमडीची नशा केली. नंतर दारू पिली. यातून दोघांत वाद झाला. त्यामुळे प्रियांशूने चाकू काढला. तो हिसकावत ध्रुवने प्रियांशूला वायरने बांधले व चाकूचा वार करत रक्ताच्या थारोळ्यात लोटले. एवढ्यावरही तो शांत बसला नाही. त्याने प्रियांशूच्या डोक्यात दगड घालून पळ काढला.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचे कथानक स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. यात प्रियांशूने झोपडपट्टीतील फुटबॉलपटू साकारला होता. झुंडच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन नागपुरात असताना त्यांनी अनेकदा कलावंतांशी हितगूजही साधले होते. प्रियांशूही त्यात होता. पण, त्याच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही.

‘झुंड’ चित्रपटाच्या वेळी नागराज मंजुळेंनी अनेक तरुणांची ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याने १० ते १५ तरुणांशी रितसर करार करत त्यांना मुंबईतल्या चित्रपट क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची संधीही दिली. यात प्रियांशूही होता. इतरांनी संधीचे सोने केले. मात्र प्रियांशू व्यसनाच्या दलदलीतून बाहेर पडू शकला नाही. त्याचा असा शेवट पाहून वेदना होत आहेत. – प्रा. विजय बारसे, स्मल सॉकर प्रणेते.