अकोला : देशात गेल्या दशकात जाणीवपूर्वक मनुस्मृतीची पेरणी केली जात आहे. हे असेच सुरू राहिले तर आपण स्वातंत्र्य गमावू. स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय तत्त्वावर आधारित संविधानच देशाला एकत्रित ठेऊ शकतो. समता व विज्ञानाच्या मूल्यांची होणारी अधोगती बघता, प्रत्येक भारतीय नागरिकाने याकडे जागरुकतेने बघून समतेसाठी उभे ठाकले पाहिजे, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले.

हेही वाचा >>> आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा

निर्भय बनो अकोलच्यावतीने प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा वानखडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.

प्रा.श्याम मानव यांनी सामाजिक, राजकीय व अंधश्रद्धा या मुद्द्यांना स्पर्श करीत संविधानाचे महत्त्व विशद केले. विषमतावादी विचारांच्या या देशातील फुले, शाहू, आंबेडकर व वारकरी संप्रदाय या दोन परंपरांनी सम्यक विचाराने उत्तर देत समतावादी विचारांची पेरणी केली. माणुसकीचा धर्म मांडला व तो प्रत्यक्षात उतरवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तोच समतावादी विचार संविधानात मांडला आणि देशातील प्रत्येक माणसाला एकतेच्या, समानतेच्या माळेत गुंफले, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ताडोबाच्या जंगलातून ‘कोलबेड मिथेन’ काढण्याचा विचार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

आरक्षणामुळे शिक्षण मिळाले, शिक्षणामुळे नोकरी मिळाली, प्रगती झाली. आरक्षण नसते तर आजही आपण गुलामगिरीत असतो, याच गुलामगिरीच्या बेड्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केले, परंतु पुन्हा त्याच गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे आता डोळसपणे बघून संविधानासोबत खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी निवडणुकीत जर मोदी,शहा पुन्हा सत्तेवर आले तर संविधान, लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य अस्ताला जातील. ही चूक पुन्हा करू नका, असे आवाहन प्रा.मानव यांनी केले.   पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नरेंद्र चिमनकर, तर आभार प्रदर्शन सौरभ वाघोडे यांनी केले.

Story img Loader