लोकसत्ता टीम
नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर योजनांना शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी कांग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात काळ्याफिती लावून सहभाग घेतला. तर फडणवीस यांनीही मी पालकमंत्री असेपर्यंत भेदभाव करणार नाही, असे स्पष्ट सांगितले.
नागपूर जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता आहे. भाजप येथे विरोधी पक्षात आहे. शनिवारी जिल्हा परिषदेतर्फे केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३७२ योजनांच्या भूमिपूजन गुमगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कॉंग्रेस नेते, माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे,उपाध्यक्ष कुंदा राऊत, विषय सभापती राजकुमार कुसुंबे, प्रवीण जोध,मिलिंद सुटे,अवंतिका लेकुरवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य उजवला बोढारे हिंगणा पंचायत समितीच्या सुषमा कावळे, उपसभापती उमेश राजपूत हे सर्व लोकप्रतिनिधी दंडावर काळ्या फिती बांधून आले.
आणखी वाचा- सावधान.. जी- २० परिषदेवर ‘एच ३ एन २’, ‘करोना’चे सावट!
जिल्हा परिषदेच्या अनेक विकास कामांना स्थगिती दिल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्याफिती बांधल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. काही वेळ व्यासपीठ पुढे हे सर्व नेते बसले. उपमुख्यमंत्री फडणवीस आले आणि त्यांनी या नेत्यांना व्यासपीठावर नेले.
आपल्या भाषणात देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी या विकासनिधींवर लावलेली स्थगिती हटवावी तसेच या कामांना आणखी एक वर्षे कालावधी वाढविण्याची मागणी पालकमंत्री फडणवीस यांच्याकडे केली सोबतच सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद करीत असूनही त्यांना शुक्रवारी रात्री ८:३०वाजता निमंत्रण पत्रिका देण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली