नागपूर : पुणे-नागपूर या अत्यंत व्यस्त रेल्वे मार्गावर आणखी एक रेल्वेगाडी (हडपसर-रिवा) सुरू करण्यात आल्याने विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सोबतच या रेल्वेगाडीमुळे मध्यप्रदेश आणि पुण्याचा संपर्क वाढणार आहे. विदर्भातील मोठ्या संख्येने युवक-युवती पुण्याला नोकरी, शिक्षणासाठी आहेत. त्यामुळे नागपूर-पुणे रेल्वेगाड्यांना कायमच गर्दी असते. या मार्गावरील खासगी बसगाड्यांना देखील मोठी मागणी आहे. या मार्गावर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होती. त्या मागणीची दखल रेल्वेने घेतली आहे.
मध्य रेल्वेद्वारे मध्यप्रदेशातील रीवा आणि महाराष्ट्रातील हडपसर (पुणे) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सेवा सुरू करण्यात आली आहे. ही नवीन सेवा दोन राज्यांतील संपर्क सुधारण्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या गाड्यांमुळे उत्तर मध्यप्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व इतर प्रवाशांना काम, शिक्षण, पर्यटन आदी कारणांसाठी प्रवास करण्यास सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.
या मार्गावर आणखी एका साप्ताहिक गाडीची भर पडली आहे. ही गाडी सुरू झाली आहे. रीवा–हडपसर एक्सप्रेस (गाडी क्रमांक २०१५२) ही गाडी ६ ऑगस्ट (बुधवार) पासून रीवा येथून नियमितपणे सुरु होईल.
हडपसर–रीवा एक्सप्रेस (गाडी क्रमांक २०१५१) ही गाडी ७ ऑगस्ट (गुरुवार) पासून हडपसर येथून नियमितपणे सुरु होईल.
गाडीचे तपशील:
गाडी क्रमांक २०१५२- रीवा-हडपसर एक्सप्रेस (साप्ताहिक):
प्रत्येक बुधवार रीवा येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर येथे त्याच दिवशी सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक २०१५२- हडपसर–रीवा एक्सप्रेस (साप्ताहिक): प्रत्येक गुरुवारी हडपसर येथून दुपारी सव्वातीन वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता रीवा येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता पोहोचेल.
ही गाडी सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया, नागपूर, वर्धा, बदनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड येथे थांबते.
या गाडीला दोन एसएलआरडी, चार सामान्य, सहा स्लीपर, तीन तृतीय वातानुकूलित, तीन इकोनॉमी, दोन द्वितीय वातानुकूलित डबे आहेत.
या नवीन गाडी सेवेमुळे मध्य रेल्वेची प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि कार्यक्षम प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे.