यवतमाळ : पुसद शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने थेट तिचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आसिफ मोहम्मद शेख कुरेशी (३०) रा. टिपूसुलतान चौक, पुसद याने आपल्या पत्नी सानिया परवीन मोहम्मद आसिफ कुरेशी (२१) हिचा कोबड्या कापायची सुरी वापरून गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना ८ जुलै रोजी पहाटे २.३० ते ३.०० वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
खून केल्यानंतर आरोपी आसिफ स्वतः पोलीस ठाणे वसंतनगर येथे हजर झाला आणि आपण पत्नीला गळा चिरून मारले, असे सांगितले. त्याच्या या कबुलीने पोलीसही हादरले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. या प्रकरणात वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, तपास अधिकारी प्रो.पोउपनि शिवप्रसाद आवळकर, तसेच सपोनी पुंडगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा, सानिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. घरात सर्वत्र रक्त पसरले होते. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकास पाचारण केले. त्यांनी घटनास्थळावरून खुनात वापरलेली कोबड्यांची सुरी जप्त केली आहे. सानिया परवीन हिला उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टर अतुल रूनवाल यांनी दिलेल्या डेथ मेमोमध्ये दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आसिफ व सानिया यांचा लग्नानंतर काही काळ सुरळीत संसार सुरू होता. मात्र मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते.खुनाच्या रात्री आसिफने पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता सानियाने विरोध केला आणि मोठा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आसिफने पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला.
मध्यरात्री घटना घडल्यानंतर आरोपी पहाटेच आरोपी थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. या प्रकरणी पोलीस नाईक ज्ञानेश्वर कराळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद आवळकर करीत आहेत.