नागपूर : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा सरकारने कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी वार्षिक भरती कॅलेंडर सुरू केले आहे. त्यामुळे पदभरती प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अखिल भारतीय एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघातर्फे नागपुरातील अजनी रेल्वे मैदानावर सोमवारी राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष बी.एल. भैरव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक श्रीमती नीनू उपस्थित होते. यावेळी वैष्णव यांच्या हस्ते कर्मचारी संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

रेल्वेमध्ये पारदर्शक पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात येत असून गेल्या १० वर्षांत पाच लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहे, असा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. मागील दशकात पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. तर २००४ ते २०१४ या कालावधीत ४ लाख ४ हजार कर्मचारी भरती झाली होती. तसेच रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक रेल्वेडबे तयार करण्यात येत आहेत. यात १२ हजार सर्वसाधारण रेल्वेडब्यांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : बिच्चारे कराळे गुरुजी! मार खाल्ला, मतंही गेली; आता कारवाई…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, नागपूरच्या सदस्यांनी वैष्णव यांनी यांचे स्वागत केले. नागपुरातील रेल्वे स्टेडियममध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी ते विशेष विमानाने दिल्लीहून नागपुरात आज सकाळी दाखल झाले. तेथून ते थेट दीक्षाभूमीवर पोहचले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे २० नोव्हेंबरला नागपूर आणि रायपूरच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, अचानक हा दौरा रद्द करण्यात आला होता. अलीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडली. वैष्णव हे या निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी होते. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर होते. त्यासाठी त्यांनी पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी आणि वैष्णव यांना सहप्रभारी नियुक्त केले होते. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या नागपूर आणि रायपूर दौरा होता. परंतु, तो रद्द करण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पुन्हा त्यांचा नागपूर दौरा तयार करण्यात आला. परंतु, त्यात नागपूर रेल्वेस्थानकाची भेट आणि रेल्वेने रायपूरपर्यंतचा दौरा स्थगित करण्यात आला. वैष्णव यांनी आज केवळ इंडिया एससी, एसटी, रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वार्षिक संमेलनात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर ते दिल्लीला परत गेले.