नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या ६० तासांपासून सतत पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी देखील सुरूच आहे. यादरम्यान पावसाने एकदाही विश्रांती घेतली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजेपर्यंत या कालावधीत जिल्ह्यात सुमारे १७२.२ मिलिमिटर पाऊस पडला. हवामान विभागाने बुधवार नऊ जुलै रोजी जिल्ह्यात पिवळा इशारा जाहीर केल्याची माहिती आहे.

जून महिना जवळजवळ कोरडाच गेला, पण जुलै महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केली. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस न थांबता अविरत सुरू आहे. यादरम्यान पावसाने एकदाही उसंत घेतलेली नाही. नागपूर ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्र विभाग पाण्याखाली आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरातील अनेक भागात पाणी साचलेले दिसून येते. शहरातील प्रमुख भागांपासून ते सखल भागांपर्यंत रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. अनेक ठिकाणी रस्ते तलावात रूपांतरित झालेले दिसले. त्यामुळे रस्त्यावर वाहने रेंगाळताना दिसली. नागरिकांना दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्याच वेळी, बाजारपेठांसह प्रमुख मार्गांवर गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण तसेच शहरी जीवनावर परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांतही असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे लक्षात घेता, जिल्हा दंडाधिकारी विपिन इटनकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक बंद

रविवारी रात्री पासून जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाहतूक खोळंबली आहे. वैनगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने मौदा, कन्हान, रामटेक आणि कुही भागातील नदी – नाले आणि ओढ्यांवरील पाणी वाढले आहे. त्यामुळे या भागातील ११ मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मौदा तालुक्यातील तारसा ते जोड रस्ता, नवेगाव ते कोराड, नालादेवी ते किरणापूर, मालोडी ते नवंगाव आणि मांदगली ते धामणगाव मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. कन्हान भागातील पेडी ते अजनी, रामटेक तालुक्यातील चौदान डोंगरी मार्ग, बनपूरी ते नगरधन आणि चौगान ते मुसेवाडी पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे. कुही मुसळगाव आणि चितापूर ते भानेवाडा मार्गावरील वाहतूकही थांबविण्यात आली आहे.