नागपूर : भारतीय हवामान खात्याने १३ ते १५ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, १३ ऑगस्टला राज्यातील बहूतांश ठिकाणी आणि प्रामुख्याने विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वारे तिथून पुढे ढकलले गेले आहेत. त्यामुळेच राज्यातील हवामानान पुन्हा एकदा बदल अपेक्षित आहेत.

मोसमी पावसाने तब्बल दोन आठवडे राज्यातून विश्रांती घेतली होती. त्यानंतर १२ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली. तर १३ ते १५ ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने प्रामुख्याने विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. आता येत्या १६ ऑगस्टपासून पुन्हा एकदा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक भागात पूराची शक्यता देखील असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

विदर्भात नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये मूसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये १६ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना इशारा दिला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी होणे आणि जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता देखील आहे. घाटमाथ्याच्या परिसरात भूस्खलनाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या दोन दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून, या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मात्र, शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पावसाचा जोर वाढवण्यास कारणीभूत ठरला आहे. दरम्यान, दोन आठवड्याच्या विश्रांतीमुळे वातावरणात निर्माण झालेला उकाडा या पावसामुळे कमी होण्याची शक्यता आहे.