भंडारा : तुमसर तालुक्यातील राजापूर या गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. या धोकादायक इमारतीत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत, हे विदारक वास्तव आता समोर आले आहे. शाळेची ही जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते, असा गंभीर धोका असतानाही प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आहे. आज सकाळी भंडारा येथे आलेल्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याची गंभीर दखल घेत ताबडतोब कारवाईचे निर्देश दिले.

तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या राजापूर गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची इमारत आता जीवघेणी बनली आहे. १९९० च्या दशकात सार्वजनिक निधीतून बांधलेली ही इमारत आता जीर्ण आणि जीवघेण्या इमारतीत बदलली आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत, छप्पर पडलेले आहेत. संपूर्ण इमारत कधीही कोसळू शकते. दररोज शेकडो विद्यार्थी या धोकादायक इमारती जवळून ये जा करीत असतात. जर इमारत अचानक कोसळली तर मोठी दुर्घटना निश्चित आहे, परंतु आजपर्यंत प्रशासन किंवा ग्रामपंचायत जागे झाले नाही हे आश्चर्यकारक आहे.

स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, मागील दोन वर्षांपासून ही इमारत हळूहळू कोसळत आहे, परंतु कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय देखील त्याच परिसरात आहे, तरीही शाळेच्या या धोकादायक इमारतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत शिक्षण विभाग झोपेत असल्याचा गावकऱ्यांचा थेट आरोप आहे. एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतरच शिक्षण विभागाला जाग येणार का असे प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. संतप्त गावकऱ्यांनी यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

“मी स्वतः घटनास्थळी जीर्ण इमारतीची पाहणी केली आहे. ही इमारत कधीही कोसळू शकते. जर १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ती पाडली नाही तर आम्ही ग्रामस्थ तीव्र आंदोलन करू.” या इमारतीमुळे जर कोणत्याही विद्यार्थ्याचा किंवा ग्रामस्थाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि प्रशासनाची असेल. आता आम्ही गप्प नाही.” असा इशारा माजी उपसरपंच वसंत बिटले यांनी दिला आहे.

ग्रामस्थांचा इशारा

राजापूरच्या नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की मुलांच्या जीवाशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही. प्रशासनाला अजूनही जाग आली नाही तर गावपातळीवर निषेध आणि शाळा बंद आंदोलन सुरू केले जाईल. ही आता फक्त एका शाळेची समस्या राहिलेली नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक बनली आहे. प्रश्न असा आहे की मुलांचे जीवन किती स्वस्त आहे आणि प्रशासन किती काळ गप्प राहणार?

“राजापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत आणि सध्या १२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या इमारतीच्या जीर्ण अवस्थेबाबत आम्ही आधीच ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर केला आहे.” – हेमंत थावरे, मुख्याध्यापक, जि,.प.पूर्व माध्यमिक शाळा राजापूर.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी आज भंडारा येथे आलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आज सकाळी नियोजन भवन येथे भेट घेतली. आणि हा धक्कादायक प्रकार त्यांना सांगितला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणात ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांना दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.