scorecardresearch

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना; जय श्रीरामचा जयघोष, भव्य शोभायात्रा व मिरवणूक

श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजोळातून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवान काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे.

Gadchiroli district ram navami Grand procession
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना

वनमंत्री मुनगंटीवारांच्या हस्ते विधिवत पूजन

जय श्रीरामाचा जयघोष, उत्साही वातावरण, ढोलताशे व लेझिम तथा भक्तिमय संगीताच्या गजरात भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून हजारो रामभक्तांच्या साक्षीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चिराण सागवान काष्ठ रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील राम मंदिरासाठी रवाना करण्यात आले.

श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजोळातून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवान काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे. छात्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे, असे गौरवोद्गार काढत राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा >>>वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर

बल्लारपूर येथील वनविकास महामंडळाच्या आगारातील राम-लक्ष्मण या सागवान काष्ठाची तसेच अयोध्या येथे पाठवण्यात येणाऱ्या चिराण सागवान काष्ठाची वनमंत्री मुनगंटीवार यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी सागवान काष्ठावर आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. वाल्मीकी समाजाचे प्रतिनिधी, राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंदगिरी महाराज, मनीष महाराज, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सचिव राहुल पुगलिया यांच्यासह मान्यवरांनीही काष्ठाचे पूजन केले. या सोहळ्यात राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्तरप्रदेश सरकारचे मंत्री रवींद्र जयस्वाल, योगेंद्र उपाध्याय, अरुण सक्सेना, यांच्यासह अरुण गोविल, दीपिका चिखलिया व सुनील लाहेरी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आदी सहभागी झाले होते.

शोभायात्रेत अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती तर एका रथावर सागवान काष्ठ ठेवण्यात आले होते. शोभायात्रेत राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेले लोककलावंतांचे पथक, आदिवासी नृत्यू, लेझिम पथक, माडिया, गोंडी नृत्य, कोकणी पथक नृत्य करीत लोकांचे लक्ष वेधून घेत होते. चहुबाजूने दिव्यांची आरास करण्यात आल्याने शहर उजळून निघाले. शोभायात्रेचा मार्ग रंगोळ्यांनी सजवण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गुढ्या-तोरणे उभारण्यात आली होती. चंद्रपुरात सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही शोभायात्रा महाकाली मंदिर परिसरात दाखल झाली. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह मान्यवरांनी आराध्य दैवत महाकाली मातेचे दर्शन घेतले.

हेही वाचा >>>वर्धा: नागरिकांनो, शोभायात्रेत सहभागी होताना घ्या काळजी, रहा सतर्क

मुख्य मार्गावर प्रभू श्रीरामचंद्राच्या मोठमोठ्या प्रतिमा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांच्या मोठ्या प्रतिमा असलेले स्वागतद्वार, महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट सजवण्यात आले होते. शोभायात्रेत ‘नारीशक्ती-साडेतीन शक्तिपीठे’ हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही होता. चांदा क्लब येथे शोभायात्रेच्या समारोपानंतर रात्री १० ते १२ या वेळेत कैलास खेर यांचा भक्तिमय गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर तिरुपती देवस्थानचे १५ हजार लाडू व महाप्रसाद वितरित करण्यात आला.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चिराण सागवान काष्ठ अयोध्येतील राम मंदिरासाठी जात आहे, हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे हे भाग्य असून या शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांचे स्वागत आहे. हा क्षण अद्भूत आहे. सर्वांसाठी आनंदाचा व उत्साहाचा क्षण आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

हे आमचे सौभाग्यच

अयोध्येतील राम मंदिरासाठी गडचिरोली-चंद्रपूर येथील सागवान काष्ठ निवडण्यात आले, हे आमचे सर्वांचे सौभाग्यच आहे.- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 12:11 IST

संबंधित बातम्या