नागपूर : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने निर्माण झालेली सहानुभूती आणि काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत असलेल्या नाराजीमुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर काँग्रेसचे आव्हान उभे ठाकले आहे.

रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढत आहे. तर शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी न देता काँग्रेसमधून आलेल्या पारवेंना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. रामटेक लोकसभेसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. येथे मागील दोन निवडणुकीत कृपाल तुमाने विजयी झाले. शिवसेना फुटल्यानंतर तुमाने शिंदे यांच्या सेनेत गेले. भाजपने या जागेवर दावा केला. पण, वाटाघाटीत शिंदेंना ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश आले. पण, भाजपने त्याबदल्यात तुमाने यांचा दावा संपवला. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे हे भाजपकडून लढण्यास इच्छुक होते. परंतु, ही जागा शिवसेनेकडे गेल्याने ते सेनेच्या चिन्हावर मैदानात उतरले. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तसेच भाजपचे कार्यकर्ते देखील पारवे यांच्या उमेदवारीमुळे फार उत्साही दिसत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…‘ते’ आले अन् भाजप उमेदवारासह सहकाऱ्यांना हायसे वाटले! निवडणूक व्यवस्थापनात हातखंडा असलेले…

पारवे यांच्यासमोरील आव्हान लक्षात घेऊन भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रामटेक मतदारसंघात घेतली. तसेच एकनाथ शिंदे हे दोन वेळा येथे आले. अपक्ष आमदार आशीष जयस्वाल शिंदे सेनेसोबत आहेत. परंतु, जुने शिवसैनिक नाराज आहेत. काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिले आहे. तसेच बसपचे संदीप मेश्राम हे देखील रिंगणात आहेत. हे दोन्ही उमेदवार किती मते घेतात, त्यावरून काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ठरण्याची शक्यता आहे. तसेच बर्वेंबद्दलची सहानुभूती कितपत प्रभावी ठरते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.