अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावरून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व बडनेराचे आमदार रवी राणा यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. यानंतर राज्यातील महिलांना धमकी आल्यास पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बाजूला ठेवून आरोपींना युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते घरात घुसून मारल्याशिवाय सोडणार नाही. असा इशारा रवी राणांनी दिला आहे.

तीन दिवसाआधी इसा नामक एका व्यक्तीने मुस्लिम समाजाचे नाव खराब केले आहे. ज्या देशात महिलेला मातेचे स्थान देण्यात येते, तिथे महिलांबद्दल असभ्य वर्तन करत त्याने अश्लील शिवीगाळ केली. ‘सर तन से जुदा’ अशा आशयाची धमकी नवनीत राणा यांना दिली. यासह गलिच्छ भाषेचा वापर केला. याप्रकरणी शेख इसा नामक व्यक्तीसह पाच ते सहा अजून आरोपी आहेत. त्यामुळे समाजाने त्यांना आवर घालावा.

अन्यथा कायदा व्यवस्था बाजूला राहील आणि आम्ही यांना घरात घुसून मारू. आज आम्ही कायद्याची भाषा बोलत आहोत. मात्र यापुढे जाऊन जर असा प्रकार झाला आणि यामध्ये राज्यात कुठेही महिलांबद्दल असा प्रकार घडल्याचे दिसून आले, तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक आमच्यात आहे, असे रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

रवी राणा म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणात चांगल्या प्रकारे कारवाई केली, यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाचे अभिनंदन करतो. या आरोपीला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे. अमरावती पोलीस आणि गुन्हे शाखेच्या मदतीने चार जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आठ आरोपी आहेत. यांनीच नवनीत राणांच्या हत्येचा कट रचला होता.

या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यात चर्चा झाली. मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. असे असले तरी पुन्हा जर असे कोणी धाडस केले तर युवा स्वाभिमानी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना धडा शिकवेल, असा धमकी वजा इशाराही रवी राणा यांनी यावेळी दिला. नवनीत राणा यांना शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.